विदर्भाच्या स्वातंत्र्य लढय़ात सहभागी व्हा!
By admin | Published: September 21, 2014 01:49 AM2014-09-21T01:49:07+5:302014-09-21T01:49:07+5:30
वानखडे यांचे प्रतिपादन, विदर्भ मुक्ती यात्रेचे अकोल्यात स्वागत.
अकोला: विदर्भाच्या विकासाकरिता वेगळ्या विदर्भाची नितांत गरज आहे. त्यामुळे वेगळ्या विदर्भाच्या लढय़ात प्रत्येकाने सहभागी व्हावे, असे आवाहन जन मंचचे चंद्रकांत वानखडे यांनी केले. सिंदखेडराजा ते दीक्षाभूमी अशी वाहन यात्रा जन मंच लढा विदर्भाचा संघटनेच्यावतीने काढण्यात आली आहे. या यात्रेचे शनिवारी सायंकाळी ७ वाजता वाशिम बायपासजवळील बाळापूर नाक्यावर स्वागत करण्यात आले.
जन मंच यात्रेमध्ये ज्येष्ठ समाजसेवक शरद पाटील, चंद्रकांत वानखडे, प्रकाश इटनकर यांच्यासह असलेल्या कार्यकर्त्यांचे अकोला येथील विदर्भ चळवळीतील धनंजय मिश्रा, अब्दुल गफ्फार, अरविंद गिर्हे, डॉ. के. सी. त्रिपाठी यांच्यासह कार्यकर्त्यांंनी स्वागत केले.
यावेळी बोलताना चंद्रकांत वानखडे म्हणाले की, येणार्या विधानसभा निवडणुकीत विदर्भ विरोधी नेत्यांना त्यांची जागा दाखवून द्या. विदर्भ विरोधकांना सत्तेतून तडीपार करा, विदर्भाचा विरोध खपवून घेतला जाणार नाही. जनतेच्या विकासासाठी वेगळा विदर्भ व्हायलाच हवा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. वाशिम बायपासजवळ बाळापूर नाक्यावर स्वागत केल्यानंतर यात्रा किल्ला चौक, जय हिंद चौक, गांधी चौक, बस स्थानक मार्गे अमरावतीला रवाना झाली.