'जॉईंट अॅग्रोस्को'चे उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्धाटन, नवीन संशोधनावर होणार शिक्कामोर्तब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2020 09:41 PM2020-10-26T21:41:21+5:302020-10-26T21:43:08+5:30
Joint AGRESCO : जाईंट अॅग्रोस्कोमध्ये कृषी शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनाचे सादरीकरण केले जाणार आहे.
मुंबई : राज्यातील कृषी विद्यापीठांनी केलेल्या संशोधनाचा प्रसार करण्यापूर्वी त्यांना मान्यता देण्यासाठी दरवर्षी एका कृषी विद्यापीठात संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीचे (जाईंट अॅग्रोस्को) आयोजन करण्यात येते. यंदाही जाईंट अॅग्रोस्कोचे आयोजन अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात करण्यात आले आहे. मात्र, कोरोना संकटामुळे हे ऑनलाइन होणार आहे.
जाईंट अॅग्रोस्कोचे उद्धाघटन उद्या ( 27 ऑक्टोबर) दुपारी बारा वाजताच्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे, राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. याचबरोबर, अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू, राज्यमंत्री विश्वजीत कदम, आदिती तटकरे, एकनाथ डवले, विश्वजीत माने यांच्या प्रमुख उपस्थितीसह राज्यातील कृषी विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित राहणार आहेत.
जाईंट अॅग्रोस्कोमध्ये कृषी शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनाचे सादरीकरण केले जाणार आहे. कृषी विद्यापीठातील समितीने मान्यता दिल्यानंतरच विकसित तंत्रज्ञान, संशोधन मांडण्याची संधी संबधित कृषी शास्त्रज्ञांना मिळणार आहे. त्यामुळे सर्वच संशोधक, शास्त्रज्ञ त्यांनी विकसित केलेले संशोधन समितीपुढे मांडण्यासाठीची जय्यत तयारी करीत आहेत.
राज्यात चार कृषी विद्यापीठे असून, यात अकोल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख, परभणीचे स्व. वसंतराव नाईक मराठवाडा, राहुरीचे (अहमदनगर) महात्मा फुले कृषी, तर दापोलीचे (रत्नागिरी) डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाचा समावेश आहे. या चारही कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ दरवर्षी महत्त्वाचे बियाणे व इतर संशोधन तसेच शेतीपयोगी तंत्रज्ञान विकसित करीत असतात. यात काही संशोधन अनेक वर्षांनंतर यशस्वी होते. आपल्या नावावर संशोधन असावे म्हणून, कृषी शास्त्रज्ञ अहोरात्र परिश्रम घेत असतात. विकसित केलेले हे संशोधन ज्वॉईंट अॅग्रोस्कोमध्ये मान्यतेसाठी मांडले जाणार आहे.