वैद्यकीय शिक्षण सहसंचालकांनी केली अकोला जीएमसीची पाहणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 05:08 PM2021-04-08T17:08:49+5:302021-04-08T17:11:26+5:30
Joint Director of Medical Education inspects Akola GMC : सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट दिली.
अकोला: वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले यांनी गुरुवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी केली. यावेळी त्यांनी कोविड रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या दर्जासह कोविड वार्डाचा आढावा घेतला.
जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून त्याचा ताण सर्वोपचार रुग्णालयावर येत आहे. अशातच येथे उपलब्ध मनुष्यबळ अपुरे पडत असून कोविड रुग्णांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. कोरोना काळात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच सर्वोपचार रुग्णालयातील स्थिती याचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी रुग्णांसाठी जेवण बनविण्यात येणाऱ्या मेसची पाहणी केली. तसेच येथील जेवणाची स्वत: चव घेवून त्याचा दर्जा तपासला. यानंतर त्यांनी सर्वोपचार रुग्णालयातील कोविड वॉर्डाची पाहणी केली. दरम्यान त्यांनी येथील अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सुचना दिल्या.