एमपीएससीची संयुक्त पूर्वपरीक्षा ; शहरातील ३३ उपकेंद्रे परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:19 AM2021-04-08T04:19:19+5:302021-04-08T04:19:19+5:30
परीक्षा केंद्र परिसरात पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकाच वेळी एकत्रितरीत्या प्रवेश करण्यास व घोषणा देण्यास मनाई करण्यात आली आहे. ...
परीक्षा केंद्र परिसरात पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकाच वेळी एकत्रितरीत्या प्रवेश करण्यास व घोषणा देण्यास मनाई करण्यात आली आहे. परीक्षा केंद्राच्या परिसरात परीक्षार्थी; अथवा अन्य व्यक्तींकडून शांततेस बाधा निर्माण होईल, असे कोणतेही कृत्य करता येणार नाही. परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर, फॅक्स मशीन, पानपट्टी, लॅपटॉप, टायपिंग सेंटर, एसटीडी बूथ, ध्वनिक्षेपक, इत्यादी माध्यम परीक्षा संपेपर्यंत बंद ठेवण्यात येतील. परीक्षा केंद्राच्या परिसरात इंटरनेट, मोबाइल फोन, सेल्युलर फोन, ई-मेल व इतर प्रसारमाध्यमे घेऊन प्रवेश करण्यास मनाई आहे. परीक्षा केंद्रावर कोणत्याही अनधिकृत व्यक्ती व वाहनास प्रवेशाची मनाई राहील. या प्रतिबंधात्मक आदेशातून परीक्षा केंद्रांमध्ये नियुक्त अधिकारी, कर्मचारी, परीक्षार्थी, तसेच परीक्षा केंद्रांमध्ये देखरेख करणारे अधिकृत अधिकारी, कर्मचारी व पोलीस अधिकाऱ्यांना परीक्षा संबंधित कर्तव्य पार पाडण्याच्या दृष्टीने लागू राहणार नाहीत, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
मास्क असणे बंधनकारक!
परीक्षा केंद्रात प्रवेश करणाऱ्या सर्व परीक्षार्थी, अधिकारी व कर्मचाऱ्यांची थर्मल इफ्रारेड थर्मामीटरद्वारे तपासणी करण्यात येणार आहे, तसेच हवा खेळती राहावी, यासाठी परीक्षा केंद्रातील सर्व खिडक्या, तसेच दरवाजे उघडे राहणार आहेत. सर्वांना मास्कचा वापर करणे बंधनकारक राहणार आहेत. मास्क लावल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही. प्रत्येकी दोन परीक्षार्थ्यांमध्ये किमान तीन फुटांचे अंतर राहील, अशी बैठक व्यवस्था करण्यात यावी. कोणत्याही परीक्षार्थी, अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोविड-१९ ची लक्षणे दिसून आल्यास तात्काळ नजीकच्या रुग्णालयात भरती करावे, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.