पत्रकारांचे आरोग्य तपासणी शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 01:18 AM2017-07-18T01:18:20+5:302017-07-18T01:18:20+5:30
पालकमंत्र्यांचा पुढाकार; आयएमए व मेडिकल कॉलेजचे सहकार्य
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: गृहराज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना़ डॉ़ रणजित पाटील यांच्या पुढाकाराने पत्रकारांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे २२ जुलै रोजी आयोजन करण्यात आले आहे़ महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाद्वारा आयोजित या शिबिराचा पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे़
धकाधकीच्या व स्पर्धेच्या या काळात पत्रकारिताही प्रचंड धावपळीची झाली आहे़ या धावपळीत बरेचदा पत्रकारांचे स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते़ योग्य वेळेवर योग्य त्या तपासण्या केल्या नाहीत, तर त्याचे परिणाम अनेकांना आयुष्यभर भोगावे लागतात़ हीच बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाने पत्रकारांच्या आरोग्य तपासणीची संकल्पना मांडली़ ही संकल्पना पालकमंत्री ना़ डॉ़ रणजित पाटील यांना पटल्याने त्यांनी ताबडतोब यासाठी तपासणी शिबिर घेण्याचे निर्देश दिले़ त्यांच्या निर्देशानुसार शनिवार २२ जुलै रोजी सकाळी ९ ते १२ या कालावधीत हे शिबिर पार पडणार आहे़ सिव्हिल लाइन पोलीस स्टेशनच्या बाजूला असलेल्या आएमए सभागृहात महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाच्या सदस्यांनी सकाळी ९ वाजता उपाशीपोटी या शिबिरासाठी उपस्थित राहावयाचे आहे़ लिपीड प्रोफाइल, ईसीजी, नेत्र तपासणीसारख्या महत्त्वपूर्ण तपासण्या या शिबिरात करण्यात येणार असून, पालकमंत्री डॉ़ रणजित पाटील स्वत: यावेळी हजर राहणार आहेत़ सकाळी त्यांच्याच हस्ते शिबिराचे उद्घाटन होईल़ आयएमएचे अध्यक्ष डॉ़ पुरुषोत्तम तायडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या समारंभाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सहायक अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, डॉ़ नरेश बजाज, महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष पुरुषोत्तम आवारे पाटील, प्रदेश सरचिटणीस अॅड. सुधाकर खुमकर, जिल्हाध्यक्ष अनिल माहोरे, विभागीय अध्यक्ष विठ्ठल महल्ले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत़ शिबिर तथा उद्घाटन कार्यक्रम अगदी वेळेवर सुरू होणार असल्याने सर्वांनी कार्यक्रमाला वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अनिल माहोरे, कार्याध्यक्ष नीरज आवंडेकर आणि जिल्हा सरचिटणीस जावेद जकेरिया यांनी केले आहे़