पत्रकारांनी नोंदविला अकोला जिल्हाधिकाऱ्यांचा निषेध!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 01:26 PM2019-01-04T13:26:29+5:302019-01-04T13:27:03+5:30
अकोला: अकोला जिल्हाधिकाऱ्यांनी ३१ डिसेंबर रोजी संपादक व पत्रकारांना निवासस्थानी बोलावून केलेल्या उद्दाम वर्तनानंतर माध्यम क्षेत्रात संतप्त पडसाद उमटले. जिल्हाभरात पत्रकारांनी निषेध नोंदविल्यावर गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते.
अकोला: अकोला जिल्हाधिकाऱ्यांनी ३१ डिसेंबर रोजी संपादक व पत्रकारांना निवासस्थानी बोलावून केलेल्या उद्दाम वर्तनानंतर माध्यम क्षेत्रात संतप्त पडसाद उमटले. जिल्हाभरात पत्रकारांनी निषेध नोंदविल्यावर गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये पत्रकारांनी अतिशय परखड शब्दात जिल्हाधिकाऱ्यांच्या उद्दामपणाचा समाचार घेतला. या सभेला सुमारे ३०० पत्रकारांनी उपस्थिती लावली.
पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्यावतीने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तब्बल १६ पत्रकार संघटनांच्यावतीने निषेध सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत पत्रकारांनी आपली परखड, नि:पक्ष मते मांडली. मोर्णा नदी स्वच्छ करणाºया जिल्हाधिकाºयांच्या उपक्रमाला प्रसारमाध्यमांनी भरपूर प्रसिद्धी दिली होती; मात्र मोर्णा स्वच्छतेच्या नावाखाली घेण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी समाजातील अनेक घटकांना वेठीस धरण्यात आले. जिल्हा प्रशासनाच्यावतीने या कार्यक्रमासाठी खंडणी गोळा करण्यात आली. अशा कार्यक्रमाकडे लोकांनीच दुर्लक्ष केले, तेव्हा प्रसारमाध्यमांना दोष देण्यात काहीही अर्थ नव्हता, असा सूर या बैठकीत व्यक्त करण्यात आला. या सभेत संपादक रवी टाले, संदीप भारंबे, अरुणकुमार सिन्हा, गजानन सोमानी यांच्यासह पत्रकार राजेश शेगोकार, पद्माकर आखरे तसेच पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे नेते सिद्धार्थ शर्मा, पुरुषोत्तम आवारे, शौकतअली मीरसाहेब, प्रमोद लाजुरकर, अनिल माहोरे, सुधाकर खुमकर, पी. एन. बोळे, विलास नसले, शैलेश अलोने व चंदा शिरसाट यांनी आपली परखड मते सभेत मांडली.
जिल्हाधिकाऱ्यांवर गुन्हेच दाखल व्हावे - देशमुख
अकोला जिल्हाधिकाºयांनी पत्रकारांना ठरवून दूषित पाणी पाजण्याचा प्रयत्न केला, धूर दिला तर दुसरीकडे जिल्हा परिषदेचा निधीही पळविण्याचा प्रयत्न केला, हे सारे प्रताप म्हणजे गुन्हे आहेत. पत्रकारांच्या जीविताला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न करणाºया या जिल्हाधिकाºयांवर गुन्हेच दाखल झाले पाहिजे, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी केली.
पत्रकारांच्या लेखन स्वातंत्र्यावर गदा - चौधरी
एखाद्या चांगल्या कामाची दखल घेत त्याबाबत प्रसिद्धी देणे हे पत्रकारांचे कर्तव्य आहे. त्याचप्रमाणे चुका व त्रुटीही लक्षात आणून देणे महत्त्वाचे काम आहे. चांगले प्रकाशित केल्यावर आनंद होणे साहजिकच आहे; मात्र टीका होत असेल, दखल घेतली जात नसेल, तर अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. त्यासाठी पत्रकारांच्या लेखन स्वातंत्र्यावर आक्षेप घेण्याची गरज नाही. जिल्हाधिकाºयांचे वर्तन हे पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारे असल्याने निषेधार्ह आहे, असे मत काँग्रेसचे महानगराध्यक्ष माजी आ. बबनराव चौधरी यांनी व्यक्त केले.