भुसावळ-नागपूर पॅसेंजरचा प्रवासही खुंटला
By admin | Published: January 2, 2016 08:36 AM2016-01-02T08:36:30+5:302016-01-02T08:36:30+5:30
१0 जानेवारीपर्यंत धावणार केवळ बडनेरापर्यंत; एक्स्प्रेस गाड्यांना गर्दी वाढली.
अकोला: मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळ प्रशासनाने ५१२८५/५१२८६ भुसावळ-नागपूर-भुसावळ पॅसेंजर १0 जानेवारीपर्यंत फक्त बडनेर्यापर्यंत चालविण्याचा निर्णय घेतला आहे. मंडळ प्रशासनाने शुक्रवारी घेतलेल्या या निर्णयामुळे या पॅसेंजर गाडीने प्रवास करणार्या प्रवाशांना १0 जानेवारीपर्यंत प्रचंड अडचणीचा सामना करावा लागणार आहे. भुसावळ मंडळ प्रशासनाने गुरुवारी सायंकाळी ५११८३/५११८४ भुसावळ-नरखेड-भुसावळ व ५११५१/५११५२ न्यू अमरावती-नरखेड-न्यू अमरावती या दोन गाड्या १ ते ७ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. नागपूर मंडळातसुद्धा रेल्वे रुळांच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली असल्याचे कारण स्पष्ट करीत मध्य रेल्वे प्रशासनाने ५१२८५/५१२८६ भुसावळ-नागपूर-भुसावळ पॅसेंजर गाडीसुद्धा १0 जानेवारीपर्यंत केवळ बडनेरा रेल्वे स्थानकापर्यंत चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत अतिरिक्त मालगाड्यादेखील या मार्गावर चालविण्यात येणार असल्याचे मंडळ अधिकार्यांनी स्पष्ट केले आहे. रेल्वे मार्गांची दुरुस्ती आणि अतिरिक्त मालगाड्यांची वाहतूक या परस्परविरोधी कारणांचे निटसे स्पष्टीकरण नसल्याने, केवळ पॅसेंजर गाड्या रद्द करून वा त्यांचे प्रवासाचे टप्पे कमी करून मध्य रेल्वे प्रशासनाला काय साध्य करावयाचे आहे, ही बाब अद्याप गुलदस्त्यात आहे. याबाबत इतर मंडळ अधिकार्यांना विचारणा केली असता, त्यांनीसुद्धा तिकीट विक्रीच्या माध्यमातून मंडळाला प्राप्त होणार्या महसुलावर विपरीत परिणाम होईल, असे सांगितले.
प्रवाशांची उडाली तारांबळ
भुसावळवरून पहाटे ६ वाजता सुटणारी ५११८३ भुसावळ-नरखेड पॅसेंजर सकाळी ९.१६ वाजता अकोला रेल्वे स्थानकावर पोहोचते. मात्र, शुक्रवारी सकाळी अमरावती आणि नरखेडकडे जाणार्या बहुतांश प्रवाशांना याची कल्पनाच नसल्याने अकोला रेल्वे स्थानकावर गाडीची वाट पाहत उभ्या असलेल्या प्रवाशांची एकच तारांबळ उडाली. या गाडीने दररोज अप-डाऊन करणार्या चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागला. ही स्थिती दुपारी ३ वाजता रेल्वे स्थानकावर पहावयास मिळाली. नरखेडवरून सकाळी ९ वाजता सुटणारी ५११८४ नरखेड-भुसावळ पॅसेंजर रद्द झाल्याने तारांबळ उडालेल्या प्रवाशांनी एक्स्प्रेस गाड्यांचा आधार घेतला.