महामानवाच्या कार्यातून, विचारांतून प्रेरणा घेऊन न्यायदान करा - न्यायमूर्ती भूषण गवई
By नितिन गव्हाळे | Published: December 9, 2023 10:31 PM2023-12-09T22:31:18+5:302023-12-09T22:31:33+5:30
यंदा बाबासाहेबांच्या वकिली व्यवसायाला १०० वर्ष पूर्ण झाले. त्यांच्या कार्यातून, विचारांतून प्रेरणा घेऊन न्यायदानाचे कार्य पार पडले पाहिजे, असे मत दिल्ली सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती भूषण रा. गवई यांनी येथे व्यक्त केले.
अकोला : भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मगावी न्यायालयाच्या उद्घाटन साेहळ्याला उपस्थित राहण्याचे भाग्य लाभले. बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेने न्याय, समता व बंधुता यावर आधारित सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्वातंत्र्य मिळालेले आहे. यंदा बाबासाहेबांच्या वकिली व्यवसायाला १०० वर्ष पूर्ण झाले. त्यांच्या कार्यातून, विचारांतून प्रेरणा घेऊन न्यायदानाचे कार्य पार पडले पाहिजे, असे मत दिल्ली सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती भूषण रा. गवई यांनी येथे व्यक्त केले.
अकोल्यातील कौटुंबिक न्यायालय इमारतीच्या कोनशिला समारंभाचे उद्घाटन ९ डिसेंबर रोजी दुपारी न्या. भूषण गवई यांच्या हस्ते पार पडले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी न्यायमूर्ती मुकुलिका जवळकर होत्या. यावेळी मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती रवींद्र घुगे, न्यायमूर्ती नितीन सांबरे, न्यायमूर्ती अनिल किलोर, न्यायमूर्ती संजय मेहरे, न्यायमूर्ती यनशिवराज खाेब्रागडे, न्यायमूर्ती अभय वाघवासे, प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अद्वैत क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती. मंचावर कौटुंबिक न्यायालय न्यायाधीश शुभदा ठाकरे, महाराष्ट्र ॲन्ड गोवा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष व सदस्य ॲड. मोतिसिंह मोहता, अकोला बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. प्रवीण तायडे उपस्थित होते. कार्यक्रमात अकोल्याचे सुपुत्र व चीफ जस्टिस ऑफ ओडिशाचे न्यायमूर्ती स्व. वल्लभदास मोहता यांच्या प्रतिमेचे अनावर करण्यात आले. तसेच बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे, कार्यकारी अभियंता प्रसाद पाटील यांचा न्या. गवई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायधीश शुभदा ठाकरे यांनी केले. संचालन अमरावतीच्या क्षिप्रा मानकर यांनी, तर आभार बार असोसिएशनच्या उपाध्यक्ष ॲड. देवाशिष काकड यांनी मानले. कार्यक्रमाला सर्व न्यायाधीश, विधिज्ञ, पक्षकार उपस्थित होते.
कुटुंबव्यवस्था जपण्याची गरज
यावेळी न्यायमूर्ती मुकुलिका जवळकर यांनी मार्गदर्शन करताना, यापूर्वी भाड्याच्या इमारतीतून कौटुंबिक न्यायालयाचा कारभार चालत होता. आता स्वतंत्र इमारतीतून कारभार होणार आहे. त्यामुळे कौटुंबिक दावे चालवताना संवेदनशील राहून सुसंवाद साधला पाहिजे, पण त्यापूर्वी हरवलेला सुसंवाद स्थापित करण्यात यश मिळाले पाहिजे, असे सांगत न्या. जवळकर यांनी न्यायदान, घटस्फोट होत राहतील, पण कुटुंबव्यवस्था जपणे महत्त्वाचे आहे. ते काम या इमारतीतून झाले पाहिजे, असे मत व्यक्त केले.
प्रथमच आठ न्यायमूर्ती एकत्र
अकोल्यात न्यायालयाशी संबंधित अनेक कार्यक्रम झाले, पण कधीही सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एकाचवेळी एकत्र आले नाहीत. कौटुंबिक न्यायालयाच्या कोनशिला समारंभाला एकाचवेळी मंचावर आठ न्यायमूर्तींनी हजेरी लावली. हा क्षण अविस्मरणीय असल्याचे सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती भूषण गवई यांनी याठिकाणी सांगितले.