पिंजरचे कनिष्ठ अभियंता रुजू होईना; समस्या कायम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:21 AM2021-08-26T04:21:48+5:302021-08-26T04:21:48+5:30
निहिदा: पिंजर येथील वीज कंपनीच्या उपकेंद्रांतर्गत गावांमध्ये समस्या वाढल्या असून, ग्राहक त्रस्त झाले आहेत. अशातच येथे रिक्त असलेल्या कनिष्ठ ...
निहिदा:
पिंजर येथील वीज कंपनीच्या उपकेंद्रांतर्गत गावांमध्ये समस्या वाढल्या असून, ग्राहक त्रस्त झाले आहेत. अशातच येथे रिक्त असलेल्या कनिष्ठ अभियंत्याच्या पदावर नियुक्ती करण्यात आली. मात्र, अद्याप ते रुजू न झाल्याने गावांमधील समस्या जैसे थे आहेत. वीज वितरण कंपनीचा कारभार ढेपाळला असून, वीज ग्राहक वैतागले आहेत.
पिंजर येथील उपकेंद्राचे तत्कालीन कनिष्ठ अभियंता संदीप घोडे यांच्यानंतर कनिष्ठ अभियंता पदाचा भार प्रभारीच असल्याने शेतकऱ्यांसह वीज ग्राहकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. पिंजर वीज केंद्रांतर्गत असलेल्या ६४ खेडेगावांत अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. वारंवार वीज पुरवठा खंडित होणे, कृषिपंपाचा वीज पुरवठा बंद असणे, त्यामुळे शेतकऱ्यांसह वीज ग्राहक वैतागले आहेत. तक्रारी घेऊन नागरिक कार्यालयात चकरा मारतात. मात्र, अधिकारीच नसल्याने त्यांचा हिरमोड होत आहे. पिंजर येथील वीज उपकेंद्रात कनिष्ठ अभियंत्याची ७ ऑगस्ट रोजी नियुक्ती केली आहे. मात्र, ते अद्याप रुजू न झाल्याने समस्या जैसे थे आहेत. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन शेतकऱ्यांसह वीज ग्राहकांच्या समस्या सोडविण्याची मागणी होत आहे.
-------------------
दि. ७ ऑगस्ट रोजी पिंजर उपकेंद्रासाठी कनिष्ठ अभियंत्याची ऑर्डर निघाली आहे. आतापर्यंत त्यांनी रुजू व्हायला पाहिजे होते. ते रुजू का झाले नाहीत, याबाबत चौकशी करणार.
-विजयकुमार कासट, कार्यकारी अभियंता, वीज कंपनी अकोला.