शिवसंग्रामला झटका; जागा वाटपातून डच्चू
By admin | Published: February 5, 2017 02:46 AM2017-02-05T02:46:33+5:302017-02-05T02:46:33+5:30
रिपाइंसाठी भाजपाने सोडली एक जागा .
अकोला, दि. ४- राज्य सरकारमधील घटक पक्ष असलेल्या शिवसंग्राम प्रणीत भारतीय संग्राम परिषदेला महापालिकेच्या निवडणुकीत काही जागा देण्याच्या प्रस्तावाला भाजपने ठेंगा दाखवल्याचे समोर आले आहे. शिवसंग्रामच्यावतीने सहा जागांची मागणी भाजपकडे करण्यात आली होती. भाजपने उमेदवार यादी जाहीर केली, तेव्हा शिवसंग्रामला जागा वाटपातून डच्चू दिल्याचे दिसून आले तर दुसरीकडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला (आठवले गट)एक जागा सोडण्यात आली, हे येथे उल्लेखनीय.
महापालिकेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांमध्ये घमासान रंगले आहे. युती किंवा आघाडी केल्यास पक्षातील कार्यकर्त्यांना जागा मिळणार नसल्याचा मतप्रवाह होता. योगायोगाने शिवसेना-भाजपची युती तुटली तर काँग्रेस-राष्ट्रवादीमधील आघाडी संपुष्टात आली. या निमित्ताने का होईना,पक्षातील कार्यकर्त्यांना स्वबळावर लढण्याची संधी चालून आली. अशा स्थितीत राज्यात भाजप-शिवसेना युतीमध्ये सहभागी असलेल्या शिवसंग्राम संघटनेने महापालिकेच्या निवडणुकीत स्वारस्य दाखवले. शिवसंग्रामचे राष्ट्रीय अध्यक्ष विनायकराव मेटे यांच्या सूचनेनुसार मनपाच्या निवडणुकीत शिवसंग्राम प्रणीत भारतीय संग्राम परिषदेच्यावतीने उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी भाजपच्या कोट्यातील जागा मिळाव्यात, असा संघटनेचा प्रयत्न होता. त्यानुसार शिवसंग्रामचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप लोड, जिल्हाध्यक्ष नानासाहेब भिसे यांनी भाजप नेत्यांची भेट घेऊन भाजपच्या कोट्यातील काही जागांवर भारतीय संग्राम परिषदेचे उमेदवार उभे करण्याबाबत प्रस्ताव दिला होता. महापालिकेच्या ८0 जागांसाठी भाजपमध्येच रणकंदन असताना त्यात शिवसंग्रामने जागा सोडण्याची केलेली मागणी म्हणजे अवघड जागी दुखण्यासारखा प्रकार असल्याची चर्चा भाजपमध्ये आहे. परिणामी, शिवसंग्राम ला जागा वाटपातून डच्चू देण्यात आल्याचे दिसून आले. रिपाइं (आठवले गट)च्या वाटेला प्रभाग क्रमांक १८ साठी एक जागा सोडण्यात आली, हे विशेष.