कमी खर्च, कमी वेळेत न्याय मिळण्याची गरज- न्यायमूर्ती हक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 06:10 PM2018-11-03T18:10:51+5:302018-11-03T18:11:01+5:30
शेतकऱ्यांना व जनतेला कमीत कमी खर्च व वेळेत न्याय कसा मिळेल, याकरिता चिंतन करणे आवश्यक असून, ही समस्या सोडविण्यासाठी न्यायदूत पुढे येणार आहेत, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायाधीश झेड. ए. हक यांनी केले.
मूर्तिजापूर : भारतीय राज्यघटनेने सर्वांना समान हक्क दिले आहेत. त्याचा लाभ गरीब, निराधार, दिव्यांग, वयोवृद्ध, अज्ञानी व सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या व्यक्तींना घेता न आल्यामुळे ते आपल्या न्याय व हक्कांपासून वंचित राहिले. अशा लोकांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना व जनतेला कमीत कमी खर्च व वेळेत न्याय कसा मिळेल, याकरिता चिंतन करणे आवश्यक असून, ही समस्या सोडविण्यासाठी न्यायदूत पुढे येणार आहेत, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायाधीश झेड. ए. हक यांनी केले.
सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्काबद्दल मार्गदर्शन करून न्याय व मदत करण्याच्या दृष्टीने हायकोर्ट बार असोसिएशनच्या महत्त्वाकांक्षी न्यायदूत प्रकल्पाचे उद्घाटन भागदार भवन मूर्तिजापूर येथे ३ नोव्हेंबर रोजी करण्यात आले. यावेळी न्यायमूर्ती हक बोलत होते.
उच्च न्यायालयाच्या वकिलांनी सामाजिक बांधीलकीचे भान ठेवून स्थानिक वकील बांधवांच्या मदतीने हाती घेतलेल्या देशातील पहिल्या उपक्रमाचे उद्घाटन न्यायमूर्ती झेड. ए. हक यांच्या हस्ते करण्यात आले. नागपूर हायकोर्ट बार असोसिएशनच्या वकील मंडळींनी सामाजिक बांधीलकी जोपासत साकारलेल्या संकल्पनेला मूर्तस्वरूप देत न्यायदूतद्वारा सुरू केलेले कार्य उल्लेखनीय असल्याचेही न्यायमूर्ती झेड. ए. हक यावेळी म्हणाले. वकील मंडळींनी सुरू केलेले कार्य शासनाने व न्यायालयाने जबाबदारीने स्वीकारावे तसेच न्यायालयाकडे धाव न घेता सर्वसामान्य नागरिकांनी आपली प्रकरणे आपसात मिटवावी, असे आवाहनही न्यायमूर्ती हक यांनी यावेळी केले. यावेळी अॅड. अनिल किल्लोर, अॅड. प्रफुल्ल सुबाळकर, सचिव अॅड. विजय भोरांडे, अॅड. अतुल पांडे, अॅड. पवन पांडे व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाला तहसीलदार राहुल तायडे, गटविकास अधिकारी गजानन अगर्ते, अजरअली नवाब, सुधाकर गौरखेडे, राजू वानखडे, देवीदास बांगड व इतर अनेक सर्वसामान्य नागरिक कार्यकर्ते व वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन अॅड. गणेश खानझाडे यांनी केले. आभार अॅड. खुबाडकर यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)