आत्महत्यांच्या अंधारातील ‘ज्योती’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2016 02:33 AM2016-10-03T02:33:31+5:302016-10-03T02:33:31+5:30
नवदुर्गेच्या संघर्षाची प्रेरणादायी कथा.
नीलिमा शिंगणे-जगड
अकोला, दि. 0२- शेतीतील कर्जबाजारीपणामुळे सहा वर्षांत पती, दीर आणि सासर्याने आत्महत्या केली. सारं आयुष्यच उद्ध्वस्त झालेल्या एका सामान्य महिलेने गेल्या नऊ वर्षांत आपल्या घरासह शेतीचा नेटाने सांभाळ करीत ह्यप्रगतिशील शेतकरीह्ण असा पल्ला गाठला. संकटं आणि दु:ख पचवत नियतीवर मात करणार्या ज्योती देशमुख या शेतीतल्या नवदुर्गेच्या संघर्षाची ही प्रेरणादायी कथा.
२00१ ते २00७ ही सहा वर्ष या माउलीचे अक्षरश: सर्वस्व हिरावून घेणारी ठरली. अकोला जिल्ह्यातील कट्यार गावातील ज्योती देशमुख यांचं पारंपरिक शेती करणारं एकत्रित शेतकरी कुटुंब. घरी २९ एकर वडिलोपार्जित शेती. घरात सासरे पुरुषोत्तम, दीर सुनील आणि पती संतोष, दोन जावा आणि दोन भावांचे एक मुलगा-मुलगी असं ह्यगोकुळाह्णसारखं कुटुंब. पण, २00१ पासून या घरावर नियती आणि आणि परिस्थितीने असे काही आघात केले, की ऐकून आपल्या काळजाचा ठोकाच चुकावा. शेतीतील नापिकीमुळे ज्योती यांचे सासरे पुरुषोत्तम यांनी २00१ मध्ये आत्महत्या केली. तेथून तीन वर्षांनी २00४ मध्ये त्यांचे दीर सुनील यांनी शेती आणि व्यवसायातील अपयशामुळे मृत्युला कवटाळले. यानंतर ज्योती यांचे पती संतोष यांचा पत्नीच्या मदतीने संकटांना तोंड देण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र, शेतीतील नापिकीचा फेरा संपता संपत नव्हता. अन् यातच हतबल झालेल्या संतोष यांनी २00७ मध्ये आत्महत्येचाच मार्ग निवडला. ज्योती यांच्यावर तर जणू आभाळच कोसळलं. दहा-बारा वर्षांचा मुलगा हेमंत, दिराची पत्नी आणि मुलगी आणि २९ एकर शेतीसह घराचा गाडा हाकण्याचे आभाळभर आव्हान त्यांच्यासमोर होते. पती असताना कधी घराचा उंबरठा न ओलांडणार्या ज्योती यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. मात्र, शेतीतील कोणतंच ज्ञान नसल्यानं आपल्याला हे खरंच झेपणार का? असा प्रश्न त्यांना पडायचा.
ज्योतीताईंचा शेती करण्याचा निर्णय अनेक आव्हानांनी भरलेला होता. मात्र, ध्येय निश्चित केलेल्या ज्योतीताईंनी हा खाचखळग्यांचा प्रवास जिद्दीने सुरू ठेवला. पतीच्या आ त्महत्येनंतर अनेकांनी त्यांना शेती विकण्याचा सल्ला दिला. यासाठी दबाव, धमक्यांचाही वापर करण्यात आला. गावातील एका नातेवाईकाने तर शेती हडपण्याचाही प्रयत्न केला. पण, त्यांनी या सर्व संकटांना परतवून लावत शेती कसण्याला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांना बियाणे, पीक पद्धती, खते, बाजार, कीटकनाशके याविषयी काहीच ज्ञान नव्हते. मात्र, शिकण्याची जिद्द असलेल्या ज्योती यांनी हळूहळू शेतीतील बारकावे आणि यशाचे अनेक मूलमंत्र आत्मसात केले. कापूस, सोयाबीन, तूर, या पारंपरिक िपकांच्या साथीने आपली शेती सुरू केली. शेतात बोअर केल्यानंतर खारपाणपट्टा असलेल्या त्यांच्या शेतात गोडे पाणी लागले, वीजही आली. त्यामुळे ज्योतीताईंनी बागायती शेती सुरू केली.
दहावीपयर्ंत शिक्षण झालेल्या ज्योतीताई पतीच्या निधनापयर्ंत शेती आणि व्यावहारिक जगातील गोष्टींपासून अनभिज्ञ होत्या. आता स्वत:च दुचाकीने शेतात जातात. बैलगाडी जुंपण्यापासून, तर शेतातील प्रत्येक काम ज्योतीताई लिलया करतात. घरातील कर्त्या पुरुषांच्या अकाली निधनाने त्यांच्यावर कुटुंबप्रमुखाचीही जबाबदारी आली. ज्योती यांनी मुलगा हेमंतला संगणक अभियंता बनविले. तसेच दिराच्या मुलीला आकोट येथे तिच्या आईसह शिक्षणासाठी ठेवले. शेतीच्या भरवशावरच त्यांनी नवं घर बांधलं. तर लवकरच शेतातील कामासाठी त्या स्वत:चा ट्रॅक्टर घेणार आहेत.
ज्योतीताईंच्या संघर्षाला समाजही सलाम करू लागला. त्यांच्या शेतीतील नव्या प्रयोगांबद्दल आणि योगदानाबद्दल त्यांचा अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्या पीठाने यशस्वी शेतकरी म्हणून गौरव केला. याशिवाय जिल्हा पोलीस दलाने त्यांचा ह्यजननी सप्ताहाह्णत विशेष सत्कार केला. प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत नियतीवर मात करणार्या ज्योतीताई यांनी परिस्थितीने हतबल झालेल्या महिलांना ह्यउमेद हरू नका, संघर्ष करत राहाह्ण असा संदेश दिला.