धार्मिक सण, उत्सवानिमित्त जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:16 AM2021-04-14T04:16:53+5:302021-04-14T04:16:53+5:30
राज्य राखीव दलाच्या तुकड्या तैनात अकोला : श्री राम नवमी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त शहरासह जिल्हाभरात कडेकोट ...
राज्य राखीव दलाच्या तुकड्या तैनात
अकोला : श्री राम नवमी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त शहरासह जिल्हाभरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यासाठी राज्य राखीव दलाच्या तुकड्या बोलावण्यात आल्या असून, त्यांनाही शहरासह जिल्हाभरात तैनात करण्यात आले आहे.
कोरोनाच्या गंभीर संकटामुळे राज्यभर लॉकडाऊन लावण्याची शक्यता आहे. मात्र, त्यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव होणार असल्याने तसेच श्री राम नवमीनिमित्ताने पोलीस प्रशासनाने उपाययोजना सुरू केलेल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी सायंकाळपासूनच जिल्हाभर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यासाठी नागपूर व अमरावती येथून राज्य राखीव दलाच्या तुकड्या बोलावण्यात आल्या असून, त्यांना संवेदनशील ठिकाणी तैनात करण्यात आले आहे. जिल्ह्यातील काही गावात धार्मिक उत्सवादरम्यान वाद होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी अशा ठिकाणी जास्त प्रमाणात बंदोबस्त लावला आहे. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी संवेदनशील ठिकाणांवर ड्रोन कॅमेऱ्यांची नजर ठेवली असून, कॅमेरे व गस्त वाढविली आहे. यासोबतच प्रत्येक ठिकाणावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, खुफिया पोलिसांनाही त्यांच्यावर नजर ठेवण्याचे सांगण्यात आले आहे. शहरासह जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत व शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली रात्रंदिवस गस्त चालू राहणार आहे. तसेच विविध ठिकाणी चेक पॉईंट देण्यात आले असून, त्यांच्याकडून तपासणी करण्यात येणार आहे. शहरात काही ठिकाणी नाका-बंदीही राहणार असल्याची माहिती आहे.