रस्त्यावर धावून आला कैलास, अन्यथा झाला असता खल्लास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:18 AM2021-03-25T04:18:28+5:302021-03-25T04:18:28+5:30
वाहतूक पोलिसाने वाचवला एकाचा जीव लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : अशोक वाटिका चौकातून बुधवारी दुपारी एक मोठा ट्रक जेल ...
वाहतूक पोलिसाने वाचवला एकाचा जीव
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अशोक वाटिका चौकातून बुधवारी दुपारी एक मोठा ट्रक जेल चौकाकडे जात असताना बेभान दुचाकीस्वार चुकीच्या दिशेने येऊन ट्रकखाली गेला, यावेळी क्षणाचाही विलंब न करता वाहतूक पोलीस कैलास सानप यांनी ट्रक थांबवून दुचाकीस्वाराला ट्रकच्या खालून बाहेर काढले. वाहतूक पोलिसामुळे दुचाकीस्वाराचे प्राण वाचले. त्यामुळे अनेकांनी घटनास्थळावर ‘क्षणात आला कैलास अन्यथा झाला असता खल्लास’ अशा प्रतिक्रिया दिल्या. केवळ दैव बलवत्तर म्हणूनच हा दुचाकीस्वार वाचला. मात्र, या अपघातात त्याच्या पायाला व हाताला दुखापत झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आयशर ट्रक क्रमांक (एमएच ३० बीएल ९६३१) हा नेहरू पार्ककडून खामगावकडे जाण्यासाठी अशोक वाटिका चौकातून जेल चौकाकडे वळण घेत असताना पाठीमागून ज्ञानेश्वर तुकाराम बाजोड (रा. शिवसेना वसाहत) हे दुचाकी क्रमांक (एमएच ३० एके ६००२)ने चुकीच्या बाजूने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असतानाच दुचाकी घसरल्याने अचानक आयशर ट्रकच्या पुढील बाजूने ट्रकच्या बरोबर मध्यभागी पडले. हा अपघात तिथे कर्तव्य बजावत असलेले शहर वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार कैलास सानप यांच्यासमोर घडल्याने त्यांनी त्वरित धाव घेत आयशरच्या चालकाला ट्रक जागेवरच थांबविण्यास सांगितले. दुसरे वाहतूक पोलीस अंमलदार श्रीकृष्ण गायकवाड यांनी अपघात होताच आजूबाजूला जमा झालेल्या नागरिकांच्या मदतीने जखमी ज्ञानेश्वर बाजोड यांना बाहेर काढले. त्यानंतर ट्रकमध्ये फसलेल्या दुचाकीला बाहेर काढून पोलीस स्थानक खदानचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी बोलावून ट्रक पोलीस स्थानकात पाठवला. तसेच जखमी बाजोड यांना सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. बाजोड यांच्या पायाला किरकोळ मार लागला असून, कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. शहर वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार कैलास सानप यांनी प्रसंगावधान राखत त्वरित धाव घेऊन ट्रक जागेवरच थांबवला नसता तर दुचाकीस्वार ट्रकच्या चाकाखाली आला असता. यावेळी उपस्थित नागरिकांनी वाहतूक पोलीस कैलास सानप यांचे कौतुक केले. म्हणतात ना ‘होता जिवा म्हणून वाचला शिवा’, त्यातलाच हा प्रकार म्हणावा लागेल.