कलेमुळे कसे जगायचे ते कळते!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 01:52 AM2017-09-08T01:52:15+5:302017-09-08T01:52:35+5:30
प्रत्येक जण आपल्या उदरनिर्वाहासाठी व्यवसाय करत असतो. ते पोटापाण्याचे साधन असते; मात्र आपल्यामध्ये असलेल्या कलागुणांना, आपण जोपासलेल्या छंदाला आपण वेळ दिला, ती जोपासली तर कशासाठी जागायचे, याचे भान कलेमधून मिळते. बदलत्या काळात माध्यमांचे स्वरूप बदलले, अनेक स्थित्यंतरे झालीत; मात्र कलेवर प्रेम करणारे व त्यासाठी जिवापाड मेहनत करणारे आजही आहेत. याचे प्रत्यंतर अकोल्यात विश्वास करंडकाच्या निमित्ताने आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: प्रत्येक जण आपल्या उदरनिर्वाहासाठी व्यवसाय करत असतो. ते पोटापाण्याचे साधन असते; मात्र आपल्यामध्ये असलेल्या कलागुणांना, आपण जोपासलेल्या छंदाला आपण वेळ दिला, ती जोपासली तर कशासाठी जागायचे, याचे भान कलेमधून मिळते. बदलत्या काळात माध्यमांचे स्वरूप बदलले, अनेक स्थित्यंतरे झालीत; मात्र कलेवर प्रेम करणारे व त्यासाठी जिवापाड मेहनत करणारे आजही आहेत. याचे प्रत्यंतर अकोल्यात विश्वास करंडकाच्या निमित्ताने आले आहे. बालनाट्य चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केलेला हा विश्वास करंडक बाल कलाकारांमध्ये विश्वास निर्माण करण्यचे काम करून निश्चितच पुरुषोत्तम करंडकसारखा नावलौकिक मिळवेल, असा आशावाद आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी तथा प्रख्यात साहित्यिक विजय दळवी यांनी व्यक्त केला. स्थानिक प्रमिलाताई ओक हॉलमध्ये विश्वास करंडकाच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. मधु जाधव, ‘ज्ञान हब’च्या संचालिका स्वर्णलता राठी, जेआरडी टाटा स्कूलचे संचालक प्रशांत गावंडे प्रामुख्याने उपस्थित होते. दळवी यांनी विश्वास करंडक स्पर्धा ही बालनाट्य चळवळीला गतिमान करण्याचे काम करेल, असे स्पष्ट करून अकोल्याच्या नाट्य क्षेत्राचा थोडक्यात आढावा घेतला. प्रा. मधु जाधव यांनी विश्वास करंडकाच्या निमित्ताने बालनाट्य लेखकांनाही नवी प्रेरणा मिळाली असून, ही स्पर्धा बालकलाकारांमधील प्रतिभेचा शोध घेणारा उपक्रम ठरेल, अशा आशा पल्लवित झाल्याचे स्पष्ट केले. प्रास्ताविकात प्रशांत गावंडे यांनी विश्वास करंडकामागील भूमिका स्पष्ट करून स्पध्रेच्या नियमावलीवर प्रकाश टाकला. या स्पध्रेत ३७ बालनाट्य सहभागी झाले आहेत. ही चांगली सुरुवात असल्याचे स्पष्ट केले. यावेळी जेआरडी स्कुलच्या विद्यार्थ्यांनी नांदी सादर करून या स्पध्रेचा शुभांरभ केला. सदर स्पर्धेच्या आयोजनासाठी प्रशांत गावंडे, प्रा. मधू जाधव, डॉ. सुनील गजरे, प्रदीप खाडे, अविनाश पाटील, हिरल गावंडे, प्रतिभा फोकमारे, स्नेहल गावंडे, विद्या गाडगे, अरुण गावंडे, रितेश महल्ले, नीलेश गाडगे, दिनेश अवारे, माधव जोशी, अविनाश कुळकर्णी, अमोल सावंत, लिलाधर तायडे, सुमित पांडे यांचे सहकार्य लाभत आहे. कार्यक्रमाचे संचालन, आभारप्रदर्शन आदिती बनसोड व प्रतिषा गावंडे यांनी केले.
बालकलावंतांनी रसिकांना जिंकले!
पातूर तालुक्यातील शिर्ला येथील एजुविला स्कुलच्या विद्यार्थ्यांनी ‘छान छोटे, वाईट मोठे’ हे नाटक प्रथम सादर करून स्पर्धेचा शुभारंभ केला. दिवसभरचाललेल्या या स्पर्धेत लढाईला गेला राजा, पर्यावरणाचा वाजला बाजा, पर्याय म्हणून फाशीच का?, दारूने मेला वं माय, नया आगाज, रणरागिणीचे बलिदान, ओम मित्रायं नम:, सार्वजनिक उत्सवांचा बिगुल, स्वप्न कश्मकश, श्यामची आई ही नाटके सादर करण्यात आली. ७, ८, ९ व ११ सप्टेंबर असे चार दिवस सदर स्पर्धा चालणार आहे. रोज सकाळी १0 वाजतापासून स्पर्धेतील नाटके सादर करण्यात येतील. सदर स्पर्धेत परीक्षक म्हणून अशोक ढेरे, गिरीष पडके व सतीन माजिरे हे नाट्य क्षेत्रातील दिग्गज काम करीत आहेत.
८ सप्टेंबर रोजी होणारी नाटके
मी तुमची मुलगी बोलते, मला पण बोलू द्या, घुसमट, नो दि वर्ल्ड, एकच प्रेरणा महत्वाची, बेटी बचाव, प्रकाशवाट, ताई सोहनचे स्वप्न