नाट्यगृहाच्या मागणीसाठी अकोल्यातील कलावंत जिल्हा प्रशासनाच्या दारी; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
By Atul.jaiswal | Published: August 29, 2023 05:59 PM2023-08-29T17:59:43+5:302023-08-29T17:59:53+5:30
सकल कलावंत सांस्कृतिक मंचने मांडल्या व्यथा
अकोला : शहरातील सांस्कृतिक भवनाच्या (नाट्यगृह) रखडलेले काम तातडीने पूर्ण करून कलावंतांना तालमीसाठी हक्काची जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी विविध क्षेत्रांतील कलावंतांनी सकल कलावंत सांस्कृतिक मंचाच्या छत्राखाली एकत्र येत जिल्हाधिकारी अजित कुंभार यांना सोमवारी निवेदन सादर केले.
अकोल्याने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अनेक कलावंत आपल्याला दिलेले आहेत. श्रीमंत कला वारसा लाभलेल्या अकोला शहराला स्वतःचे हक्काचे सांस्कृतिक भवन नाही. याकरिता अकोला सकल कलावंत सांस्कृतिक मंचने मागील आठवड्यात सकल कलावंत एल्गार सभेचे आयोजन केले होते. या एल्गार सभेला नाट्य, नृत्य, गायन, लोककला, संगीत, साहित्य, चित्रकला, फोटोग्राफी व इतर सर्व क्षेत्रांतील शंभरच्यावर कलावंतांचा सहभाग होता.
या सभेत आमदार व जिल्हाधिकारी यांना नवीन सांस्कृतिक भवन निर्मिती व इतर महत्त्वाच्या मागण्यांसाठी नम्र निवेदन देण्याचे ठरले. त्यानुसार सोमवारी सकल कलावंत सांस्कृतिक मंचच्या सदस्यांनी अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांना भेटून आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. या प्रसंगी दिलीप देशपांडे, शाहीर वसंत मानवटकर, प्रा. तुकाराम बिरकड, प्रा. नीलेश जळमकर, प्रशांत जामदार, सचिन गिरी, सुधाकर गिते, देवेंद्र देशमुख, रावसाहेब काळे, किशोर बळी यांच्यासह विविध क्षेत्रांतील कलावंत मंडळी उपस्थित होती.
आमदारांचीही घेतली भेट
मंचच्या सदस्यांनी अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांना भेटून त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. सावरकर यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून शासनाकडून आवश्यक तो निधी तत्काळ उपलब्ध करून देण्यात येईल तसेच अकोल्यातील सर्व कलावंतांच्या इतर सर्वच मागण्या व अडचणीसंदर्भात आपण योग्य भूमिका घेण्यास प्रतिबद्ध असल्याची ग्वाही दिली.
या आहेत मागण्या...
- निर्माणाधीन असलेले क्रीडा संकुल येथील सांस्कृतिक भवनचे काम त्वरित पूर्ण करावे.
- स्व. प्रमिलाताई ओक सभागृहाचे दर कमी करण्यासाठी प्रयत्न करावे.
- नाट्यकलावंतांसाठी हक्काची तालमीची जागा उपलब्ध करून द्यावी
- इतर कार्यक्रम सादरीकरणासाठी छोटे नाट्यगृह (मिनी थिएटर)ची निर्मिती करावी.