असंघटित कामगारांसाठी दुवा ठरणार कल्याणकारी मजूर संघ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 01:07 PM2018-12-30T13:07:25+5:302018-12-30T13:08:18+5:30
अकोला: शासन, लोकशासन आणि मजूर यांच्यामधील दुवा कल्याणकारी असंघटित मजूर संघ राहणार आहे.
अकोला: शासन, लोकशासन आणि मजूर यांच्यामधील दुवा कल्याणकारी असंघटित मजूर संघ राहणार आहे. मजूर संघ असंघटित कामगारांसाठी भविष्यात रुग्णालय, महाविद्यालय, वृद्धाश्रम उभारणार असून, यापैकी रुग्णवाहिका हा प्रकल्प हाती घेतला असून, लवकर पूर्णत्वास जाणार असल्याचे संघाचे अध्यक्ष बाबूलाल डोंगरे यांनी सांगितले.
शासकीय विश्रामगृह येथे शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत नव्याने स्थापन करण्यात आलेल्या मजूर संघाबाबत माहिती देण्यात आली. भिकारी जोडपे जे उघड्यावर राहतात, अशा लोकांसाठी वृद्धाश्रम उभारण्यात येणार आहे. लोकवर्गणीतून हे सर्व उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही डोंगरे यांनी स्पष्ट केले. बांधकाम असंघटित कामगार, शेतमजूर, माथाडी, हमाल, रोजगार सेवक, हातमजुरी अंगमेहनतीचे काम करू न रोजंदारी प्राप्त करीत असलेल्या दुबळ्या लोकांसाठी कल्याणकारी असंघटित मजूर संघाची स्थापना करण्यात आली आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ मजुरांना मिळवून देण्याकरिता संघटना झटणार आहे. असंघटित मजुरांना संघटित करण्याचे मुख्य ध्येय संघटनेचे आहे. याकरिता संघाचे पहिले अधिवेशन लवकरच घेण्यात येणार असल्याचे डोंगरे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला सचिव विजय टाले, उपाध्यक्ष प्रवीण खंडारे, राजू पांढरे, बंडू वानखडे, राजेश चितोडे, सुनील शिराळे, धर्मदीप धांडे, गुणवंत सिरसाट, साहेबराव खडे, अमर वानखडे व नितीन गवई उपस्थित होते.