बाळापुरात रस्त्यावर फेकला कांदा!

By admin | Published: June 2, 2017 02:02 AM2017-06-02T02:02:20+5:302017-06-02T02:02:20+5:30

शेतकरी संप; अकोला, अकोटात दिले निवेदन

Kanda on the road in Balapur! | बाळापुरात रस्त्यावर फेकला कांदा!

बाळापुरात रस्त्यावर फेकला कांदा!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शेतमालाला हमी भाव आणि संपूर्ण कर्ज माफी देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी १ जूनपासून पुकारलेल्या संपाला अकोला शहरासह जिल्ह्यातही प्रतिसाद मिळाला. बाळापूर तालुक्यातील बाग फाटा येथे शेतकऱ्यांनी कांदा रस्त्यावर फेकून संपात सहभाग घेतला. अकोला व अकोट शहरात उपविभागीय अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी १ जूनपासून संपाची हाक दिली होती. या हाकेला अकोला जिल्ह्यात प्रतिसाद मिळाला. भाजीपाल्याची रात्री खरेदी करण्यात आलेली असल्याने पहिल्या दिवशी या संपाचा परिणाम जाणवला नाही; मात्र दुसऱ्या दिवसाच्या हर्रासीवर याचा परिणाम होऊन दिवसभराचे व्यवहार विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
बाळापूर-पातूर रस्त्यावरील बाग फाटा येथे राज्यव्यापी संपाला पाठिंबा देत रस्त्यावर कांदा फेकून निषेध व्यक्त केला. यावेळी अमोल ठाकरे, अक्षय तायडे, पवन पवार, राहुल लाव्हरे, जगदिश पाटील हागे, ज्ञानेश्वर सांगोकार, नंदु पाखरे, गोवर्धन गवई, दिलीप भोंगरे, गोवर्धन जमाव आदी युवा शेतकरी उपस्थित होते. उर्वरित ठिकाणी परिणाम जाणवला नाही.
अकोला शहरात शेतकरी संघटनेने संपात सहभागी होण्याचे आवाहन करीत उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले. राज्यभरात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या संपाला आमचा पाठिंबा असून, मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही आंदोलन करणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या निवेदनावर डॉ. अविनाश नाकट, मनोज तायडे, प्रशांत गावंडे आदींसह अनेकांची स्वाक्षरी आहे.
पातूर येथे शेतकरी संपावर जाण्याचा फारस परिणाम जाणवला नाही. अकोटात शेतकरी संघटनांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. संपाचा परिणाम जाणवला नाही. मूर्तिजापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती बंद होती. खेड्यातून येणारा दुधाचा पुरवठा बंद होता. शहरातील दूध डेअरीवरून दूध विक्री सुरू होती. काही शेतकऱ्यांनी भाजीपाला विकणे टाळले. तेल्हारा आणि बार्शीटाकळी तालुक्यातही या शेतकरी संपाचा फारसा परिणाम जाणवला नाही.

आवक बंद होण्याआधीच कडाडले भाव
- शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि हमीभाव मिळावा म्हणून राज्यभरातील शेतकरी १ ते ७ जूनपर्यंत संपावर जात असल्याने अकोल्यातील भाजीबाजार अडत दुकानदारांनी भाजीपाल्याचे भाव एका दिवसाआधीच वाढविले आहे. शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या या आंदोलनाचा फटका आता अकोलेकरांना सोसावा लागणार असल्याचे संकेत आहेत.
- शासकीय धोरणावर नाराज असलेल्या शेतकऱ्यांनी शेतकरी संघटना आणि किसान क्रांतीच्या वतीने राज्यात १ ते ७ जूनपर्यंत आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. कोणत्याही शेतकऱ्याने बाजारपेठेत भाजीपाला आणू नये, वाटल्यास जनावरांना चारा खाऊ घालावा. गाई-म्हशींचे दूधही शहरवासीयांना देऊ नये. तेवढे दिवस मुलाबाळांना दूध पाजावे, असे आवाहन शेतकऱ्यांनी संघटनेच्या माध्यमातून केले आहे. त्यामुळे ३१ मे १७ रोजी अकोल्यातील जनता बाजारातील अडत्यांनी अतिरिक्त माल बोलावून ठेवला; मात्र त्यातही पत्ता कोबी, टमाटे आणि वांगे यांचाच समावेश आहे. कारण भाजीपाला दोन दिवसांनंतर सडत असल्याने तो साठा ठेवता येत नाही.
- १ जूनपासून बाजारपेठेत भाजीपाला येणार नसल्याने ३१ पासूनच वधारलेल्या भावाने बाजारात विक्री सुरू झाली आहे. गुरुवारी अकोला जनता बाजारात शिमला मिरची, वांगे, फुलकोबी, पत्ता कोबी, दुधी भोपळा, बीट यांचे भाव ४० रुपये किलो झाले. दहा रुपये किलोने जाणारी पालक, मेथी, चवळी आदी हिरव्या भाज्यांची गड्डीही दहावरून पंधरा ते वीस रुपये करण्यात आली.
- अकोल्यातील जनता बाजारात ही स्थिती असल्याने शहरातील इतर बाजारपेठांमधील स्थिती त्याहून अधिक भाववाढीची झाली आहे. गाडी आणि ठेलेवाल्यांनीदेखील भाजीपाल्यांच्या अतिरिक्त किमती घेणे सुरू केले आहे. या आठ दिवसात भाज्यांचे भाव अधिक मोठ्या प्रमाणात कडाडण्याचे संकेत आहेत.

बाजारपेठेचा चक्का जाम
अकोल्यात दररोज नाशिक,श्रीरामपूर, बुलडाणा, चिखली, पातूर, अकोट येथून भाजीपाल्यांचा साठा येत असतो; मात्र गुरुवारी रात्री साडेदहा वाजेपर्यंत कोणत्याही प्रकारचा भाजीपाला अकोल्यात आला नव्हता. भाजीपाल्यांची नासधूस आंदोलकांकडून रस्त्यात होत असल्याने आणि शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने यामध्ये सहभाग घेतल्याने हा संप यशस्वी होण्याचे संकेत आहे. राज्यातील विविध विभागांसोबत अकोल्यात मध्यप्रदेशातूनही भाजीपाला येतो. सांभार आणि पत्ताकोबीचा साठा गुरुवारी रात्री अकोल्यात दाखल झाला.

संपावर गेलेल्या शेतकऱ्यांचा बाजारपेठेवरील परिणाम शुक्रवारपासून जाणवणार आहे. अडत दुकानदार आणि व्यापारी भाजीपाला साठवू शकत नाही. त्यामुळे या आंदोलनामुळे भाववाढ निश्चित आहे.
- सज्जाद हुसेन, भाजीपाला असो. पदाधिकारी.

Web Title: Kanda on the road in Balapur!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.