दिल्लीतून वाटल्या कानपूर विद्यापीठाच्या डिग्री; मुख्य सूत्रधार जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 01:20 PM2019-01-25T13:20:38+5:302019-01-25T13:20:58+5:30
अकोला : खदान पोलिसांनी उघडकीस आणलेल्या बनावट ‘डिग्री’ प्रकरणातील मुख्य सूत्रधार विजेंदर ठिल्लुराम याला दिल्लीतून अटक करण्यात खदान पोलिसांना यश आले आहे.
अकोला : खदान पोलिसांनी उघडकीस आणलेल्या बनावट ‘डिग्री’ प्रकरणातील मुख्य सूत्रधार विजेंदर ठिल्लुराम याला दिल्लीतून अटक करण्यात खदान पोलिसांना यश आले आहे. सदर आरोपीस अटक करून गुरुवारी न्यायालयासमोर हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणात नागपूर येथील चंद्रशेखर बनसोड याला आधीच अटक करण्यात आली आहे. या दोघांकडून कलर प्रिंटर, पेन ड्राइव्ह आणि दस्तऐवज जप्त करण्यात आले आहेत.
केदार वैद्यनाथ सूर्यवंशी यांच्या तक्रारीवरून बनावट डिग्री वाटप प्रकरणात खदान पोलिसांनी जुलै महिन्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू करताना पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला असता नागपूर येथील शाहनवाज अब्दुल रब, मोहम्मद इम्तीयाज अन्सारी, जुनेद अख्तर तसेच कामठी येथील कार्तिक कन्नास्वामी आणि हरियाणा येथील उधमसिंह या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर या पाचही आरोपींची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी दिलेल्या माहितीवरून नागपूर येथील चंद्रशेखर बनसोड याला १९ जानेवारी रोजी अटक करण्यात आली होती, तर त्यानंतर गुरुवारी मुख्य सूत्रधार विजेंदर ठिल्लुराम याला अटक करण्यात आली आहे. या बनावट डिग्री प्रकरणाचा तपास ठाणेदार अनिल जुमळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक शशिकांत नावकार करीत असून, आणखी काही आरोपींना अटक करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
बनावट डिग्रीचा दिला डेमो; ठाणेदार अनिल जुमळेंना दिली बी-टेकची डिग्री!
खदान पोलिसांचे एक पथक दिल्ली येथे पोहोचल्यानंतर मुख्य सूत्रधार विजेंदर ठिल्लुराम याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील काही दस्तऐवज व साहित्य जप्त केल्यानंतर पोलिसांनी त्याला डिग्री बनविण्यासंदर्भात विचारणा केली असता त्याने पोलिसांना बनावट डिग्रीचा डेमोच दिला. कुणाच्या नावाची डिग्री बनवायची, हे विचारल्यानंतर सदर आरोपीने खदानचे ठाणेदार अनिल जुमळे यांच्या नावाने काही क्षणातच बी-टेक सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री तयार करून दिली. कानपूर येथील छत्रपती शाहूजी महाराज विश्वविद्यालयातून त्यांनी ही डिग्री प्राप्त केल्याचे यावर दाखविण्यात आले, तर यासाठी २०१८ मध्येच त्यांनी परीक्षा दिल्याचीही नोंद करण्यात आली. यावरून सदर ठगबाजाने अशा अनेक डिग्री वाटप केल्याचे समोर आले आहे.