कापशी तलाव; तांत्रिक सल्लागारच्या निविदा उघडल्या
By admin | Published: February 27, 2016 01:41 AM2016-02-27T01:41:45+5:302016-02-27T01:41:45+5:30
तीन कंपन्यांचे अर्ज प्राप्त; प्रशासन देणार वर्कऑर्डर
अकोला: महापालिकेच्या मालकीच्या असलेल्या कापशी तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी तांत्रिक सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे. त्यानुषंगाने मनपा जलप्रदाय विभागाने प्रकाशित केलेली निविदा उघडण्यात आली असून, तीन कंपन्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. येत्या आठवडाभरात पात्र कंपनीला वर्कऑर्डर दिल्या जाईल.
शहरापासून नजीक कापशी तलावाच्या देखरेखीकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. मनपाचे तत्कालीन आयुक्त चंद्रशेखर रोकडे यांनी शहराला पाणीपुरवठा करणारी बीडची पाइपलाइन काढून घेतल्यानंतर पुढील प्रक्रिया ठप्प पडली.
या तलावात होणार्या मासेमारीपासून मनपाला अत्यल्प आर्थिक उत्पन्न प्राप्त होते. तलावातील जलसाठय़ाचा पिण्यासाठी वापर होत नसून, प्रचंड प्रमाणात गाळ साचला आहे.
अशावेळी शहरातील पक्षीप्रेमी व निसर्गप्रेमींच्या भावना लक्षात घेता या ठिकाणी सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव मनपाने समोर केला. जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी तातडीने पावणे दोन कोटींचा निधी उपलब्ध करून दिला.
या निधीतून तलावाला आवारभिंत उभारण्यासह विविध कामे केली जातील. सौंदर्यीकरणासाठी मनपाने तांत्रिक सल्लागारची नियुक्ती करण्याचा निर्णय घेत निविदा प्रक्रिया राबवली. यादरम्यान, मनपाला तीन निविदा अर्ज प्राप्त झाले. प्रशासनाने निविदा उघडल्या असून, कमी दराने सादर केलेल्या कंपनीची तांत्रिक सल्लागार म्हणून नियुक्ती केली जाईल.