काेराेनामुक्त गाव कापशीत साेमवारपासून भरणार शाळा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:13 AM2021-07-08T04:13:58+5:302021-07-08T04:13:58+5:30
रवी दामोदर अकाेला : काेराेनामुक्त गावांमध्ये शाळा सुरू करण्याबाबत शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करीत अकाेला तालुक्यातील कापशी ग्रामपंचायतीने शाळा ...
रवी दामोदर
अकाेला : काेराेनामुक्त गावांमध्ये शाळा सुरू करण्याबाबत शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करीत अकाेला तालुक्यातील कापशी ग्रामपंचायतीने शाळा सुरू करण्याचा ठराव घेतला आहे. साेमवार, १२ जुलै रोजी शाळा सुरू हाेणारे कापशी हे जिल्ह्यातील पहिले गाव ठरणार आहे. येथे सर्वप्रथम इयत्ता आठवी, नववी व दहावीचे वर्ग सुरू होणार आहेत, तसेच त्यानंतर वर्ग पाचवी, सहावी, सातवीचे वर्ग हे सोमवार, दि. २६ जुलैपासून सुरू करण्याचा ठराव घेण्यात आला आहे.
अकोला तालुक्यातील कापशी रोड येथील शाळेची घंटा सोमवारपासून वाजणार आहे. कोरोनाच्या संकटकाळात राज्यातील सर्व शाळा बंद होत्या. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू केले. ग्रामीण भागात येणाऱ्या अडचणी व शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. याची दखल घेत गावकऱ्यांनी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने ७ जुलै रोजी ठरावही घेतला आहे. यावेळी शाळा समितीचे सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, पोलीस पाटील, तलाठी, सरपंच, उपसरपंच, प्राथमिक उपचार केंद्राचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
-----------------------------
विद्यार्थ्यांची ५० टक्के उपस्थिती; पालकांचे संमतीपत्र आवश्यक
कापशी ग्रामपंचायत प्रशासनाने ठराव घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने नियमावली तयार केली असून, त्यानुसार, ५० टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शाळा भरणार आहे, तसेच शाळा चालकांनी पालकांचे संमतीपत्र घेणे अनिवार्य राहील, तसेच विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचे की, नाही हे पालकांवर अवलंबून असणार आहे.
----------------------------
आरोग्याचा खर्च लोकसहभागातून उभारणार!
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अटी व शर्थींचे पालन करून कापशी येथील शाळा सोमवारपासून सुरू करण्यात येत आहेत. पालकाच्या संमतीनेच विद्यार्थ्यांना शाळेत पाठविले जाणार आहे. शाळेत कोरोना नियमावलींचे पालन करण्यात येणार आहे. मात्र, एखाद्या विद्यार्थ्यास कोरोनाचा संसर्ग झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी पालक, ग्रामस्थांनी घेतल्याचे ठरावात नमूद आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी लागणारा खर्च लोकसहभागातून उभा केला जाणार आहे, तसेच गावातील खासगी डॉक्टरांनी विद्यार्थ्यांचा मोफत उपचार करण्याची हमी दिल्याचे ठरावात नमूद आहे.
-------------------
प्रत्येक बाकावर एक विद्यार्थी, मास्क अनिवार्य
शाळेत विद्यार्थ्यांची बैठक ही प्रत्येक बाकावर केवळ एकच विद्यार्थी असणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्यास मास्क अनिवार्य आहे. शाळेत सॅनिटायझर, हात धुण्यासाठी व्यवस्था असणे आवश्यक आहे.
--------------------------------------------
दर १५ दिवसांनी प्रत्येकाची चाचणी
शाळेत उपस्थित असणाऱ्या प्रत्येक शिक्षकाचे लसीकरण झालेले असणे अनिवार्य केले आहे, तसेच शाळा सुरू झाल्यानंतर दर पंधरा दिवसांनी प्रत्येक शिक्षकाची व विद्यार्थ्याची प्राथमिक आरोग्य केंद्राकडून विनामूल्य कोरोना चाचणी करण्यात येणार असल्याची हमी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिल्याचे ठरावात नमूद आहे.
------------------------
ग्रामीण भागात ऑनलाइन शिक्षणाचा फज्जा उडाला असून, विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांचे हित पाहता शाळा सुरू करण्याचा ठराव घेण्यात आला आहे. शाळेत कोरोनाविषयक नियमांचे तंतोतंत पालन करण्यात येणार आहे. प्रत्येकास मास्क अनिवार्य केले आहे, तसेच एखाद्यास संसर्ग झाल्यास त्याच्या आरोग्याचा खर्च लोकसभागातून उभारला जाणार आहे.
-अंबादास उमाळे, सरपंच, कापशी रोड
---------------------
(फोटो)