काेराेनाचा प्रभाव वाढला, शाळाबाह्य मुलांच्या शाेध माेहिमेला शिक्षकांचा नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:19 AM2021-03-05T04:19:04+5:302021-03-05T04:19:04+5:30
अकाेला शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शोध मोहिमेद्वारे शोधून शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाच्यावतीने १ मार्च ते १० मार्चपर्यंत शाळाबाह्य मुलांची ...
अकाेला शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शोध मोहिमेद्वारे शोधून शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाच्यावतीने १ मार्च ते १० मार्चपर्यंत शाळाबाह्य मुलांची शाेध माेहीम सुरू झाली आहे ही माेहीम काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच असल्याने तूर्तास शाळाबाह्य मुलांची शाेध माेहीम स्थगित करण्यात यावी, अशी मागणी शिक्षक संघर्ष समितीने केली आहे.
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण अधिनियम २००९ अन्वये ६ ते १४ वयोगटातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांची शोध मोहीम १० मार्चपर्यंत राबिवण्याचा आदेश शालेय शिक्षण विभागाने दिला आहे. ०३ ते १८ वयोगटांमध्ये विद्यार्थी शिक्षण प्रवाहाच्या बाहेर असतील तर त्यांना या सर्वेक्षणामार्फत शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी या माेहिमेद्वारे प्रयत्न केले जातात. तीन ते सहा या वयोगटातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांची शोध माेहीम अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मदतीने पार पाडण्यात येते तर ६ ते १८ वयोगटातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांची शोध मोहीम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक यामधील शिक्षकांच्या माध्यमातून सदर सर्वेक्षण पार पाडले जाते.
वाड्या, वस्त्या, घराेघरी जाऊन हे सर्वेक्षण करावे लागणार आहे. मात्र जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता शोध मोहीम स्थगित करावी व कोरोना आजाराचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानंतर शोध मोहीम राबवावी, अशी मागणी शिक्षक संघटना संघर्ष समितीच्यावतीने मंगळवारी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.
शिक्षक संघटना म्हणतात
जिल्हा परिषदेतील उर्दू शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, दिव्यांग शिक्षक संघटना, शिक्षक परिषद प्राथमिक, शिक्षक आघाडी, प्रतिनिधी सभा, ॲक्शन फोर्स, आदिवासी विकास परिषद, केंद्र प्रमुख व पदवीधर शिक्षक संघटना, स्वाभिमान शिक्षक संघटनेच्या समितीने ही माेहीम काेराेनाचा प्रभाव ओसरेपर्यंत स्थगित करण्याची मागणी केल्याची माहिती संघर्ष समितीचे समन्वयक राजेश देशमुख यांनी दिली आहे.
दाेन वर्षांपूर्वी ३५० बालक हाेते शाळाबाह्य
दाेन वर्षांपूर्वी शाळाबाह्य सर्वेक्षण मोहीम राबिवण्यात आली हाेती. यावेळी शाळाबाह्य मुलांची संख्या ३५० हाेती. तसेच वीटभट्ट्यांवर काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांची संख्या ३५ असल्याचे समाेर आले हाेते.