तेल्हारा तालुक्यात कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:20 AM2021-07-27T04:20:02+5:302021-07-27T04:20:02+5:30
तेल्हारा: तालुक्यातील आजी-माजी सैनिक संघटनांनी पुढाकार घेत स्थानिक भागवत मंगल कार्यालयात सोमवार, दि. २६ जुलै रोजी कारगिल विजय दिवस ...
तेल्हारा: तालुक्यातील आजी-माजी सैनिक संघटनांनी पुढाकार घेत स्थानिक भागवत मंगल कार्यालयात सोमवार, दि. २६ जुलै रोजी कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळा देत शहीद झालेल्या वीर जवानांना आदरांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सुभेदार सुरेश जवकार हे होते, तर प्रमुख उपस्थिती कारगिल युद्धातील सैनिक मधुकर निमकंडे, बाळकृष्ण बोदडे, नगराध्यक्ष जयश्री पुंडकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक तापडिया, पोलीस उपनिरीक्षक गणेश कायंदे, नायब तहसीलदार सुरडकर यांची होती. यावेळी सर्वप्रथम भारतमातेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. नगराध्यक्ष जयश्री पुंडकर, पोलीस उपनिरीक्षक कायंदे, नायब तहसीलदार सुरडकर या प्रमुख अतिथींनी युवक, युवती, नागरिक यांना कारगिल विजय दिवसाबद्दल माहिती दिली. कार्यक्रमात देशभक्तीपर गीतगायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आजी माजी सैनिक संघटनेने अनेक उपक्रम राबवून राष्ट्रीय पातळीवर अनेक विद्यार्थी संघटनेने खेळाच्या माध्यमातून चमकवले हे विशेष. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सैनिक पांडुरंग खुमकर यांनी, तर आभार माजी सैनिक दिनेश माकोडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुक्यातील आजी-माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष राम पाऊलझगडे, उपाध्यक्ष राम घंगाळ व संघटनेचे पदाधिकारी व सदस्यांची उपस्थित होती.
---------------------
जामठी येथे शहीद जवान विजय तायडे यांना अभिवादन
जामठी बु.: येथील शहीद जवान विजय बापूराव तायडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ व कारगिल विजय दिनानिमित्त दि. २४ जुलै रोजी साध्या पद्धतीत कार्यक्रम आयोजित करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला राष्ट्रगीताने सुरुवात करण्यात आली. शहीद जवान विजय तायडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास सरपंच अर्चना संदीप तायडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर वृक्षारोपण, गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, निराधारांना साडीचोळी वाटप, माजी सैनिकांचा सत्कार असे विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी शहीद जवान विजय तायडे बहूद्देशीय संस्थेचे अध्यक्ष भैय्यासाहेब तायडे, वीरमाता मनकर्णाबाई बापूराव तायडे, सरपंच अर्चना संदीप तायडे, उपसरपंच विलास गुल्हाने, माजी सरपंच डाॅ. गोपाल बोळे, नंदकिशोर राऊत, माजी उपसरपंच बाळकृष्ण तायडे, ग्रामीण बँक शाखाधिकारी भूषण पणजकर, माजी उपसभापती जितेंद्र गुल्हाने, कैलास कोकाटे, अयूब खान, विनोद तायडे, गजानन गवई, सुजीत तायडे, हिंमतराव किर्दक, शोभा तायडे आदी उपस्थित होते.