वर्षभरातून एकदाच उघडते मूर्तिजापुरातील कार्तिक स्वामींचे मंदिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 11:03 AM2020-11-28T11:03:43+5:302020-11-28T11:05:29+5:30
दरवर्षी पोर्णिमेला व कृतिका नक्षत्रात हजारोच्या संख्येने भाविक येतात
मूर्तिजापूर: येथील जुनी वस्ती देवरण मार्गावरील माजी नगराध्यक्ष दादासाहेब जमादार यांच्या शेतातील मार्कण्डेश्वर मंदिराच्या तळभागात भगवान कार्तिकेय स्वामींची सुरेख व सुंदर संगमरवरची षण्डमुखी मूर्ती आहे. दरवर्षी पोर्णिमेला व कृतिका नक्षत्रात हजारोच्या संख्येने भाविक येतात. यंदा दुर्मिळ दर्शनाचा योग हा रविवार, २९ नोव्हेंबर रोजी येत आहे.
येथील मंदिरात दरवर्षी आंध्रप्रदेश, मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील विविध भागातून भाविक दर्शनासाठी येत असतात. यावर्षी कार्तिक स्वामींच्या दर्शनाचा योग हा २९ नोव्हेंबर रविवार रोजी येत आहे. हे धार्मिक स्थळ कानपूरचे नागा निर्वाण महाराज, अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराजांच्या व्यासपीठावर विराजमान चतुर्थ महाराज पुरुष गजानन महाराज, चिखलीचे संत मौनीबाबा, मूर्तिजापूरचे संत बद्रीनाथ महाराज आदींच्या सहवासाने पावन झालेले आहे, तसेच या ठिकाणी मार्कण्डेश्वर मंदिरात महादेवाची पिंड व पिंडीला घट्ट मिठी मारून शरणागत बाल मार्कण्डे ऋषीची संगमरवरी मूर्ती आहे. तसेच समोरच यमराज देवतेची काळ्या पाषाणाची मूर्ती आहे. हा संपूर्ण परिसर निसर्ग व आध्यात्मिक लहरींनी भारलेला असून, येथे बद्रीबाबा महाराज, बलदेव महाराज, वैध महाराज आदी संतांची समाधी आहे. यावर्षी कार्तिक पोर्णिमा ३० नोव्हेंबर सोमवारी आहे; परंतु भगवान कार्तिकेय दर्शनासाठी मुहूर्त रविवारी आहे. या मुहूर्तावर दरवर्षी या मंदिराच्या गाभाऱ्यात नैसर्गिक प्रवाहाने पाणी साचले जात असल्याची माहिती आहे. रविवारी कृतिका नक्षत्रात दिवसभर मंदिर दर्शनासाठी उघडे राहील व संध्याकाळी ७ नंतर मंदिर बंद करण्यात येईल, अशी माहिती दादासाहेब जमादार माजी नगराध्यक्ष यांनी दिली.