कपाशीवर ड्रोनद्वारे कीटकनाशक फवारणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 05:11 AM2018-09-21T05:11:43+5:302018-09-21T05:11:45+5:30
कीटकनाशकावर नियंत्रण मिळविण्यासाठी आता कपाशीवर ड्रोनद्वारे फवारणी करण्यात येणार आहे.
- राजरत्न सिरसाट
अकोला : कीटकनाशकावर नियंत्रण मिळविण्यासाठी आता कपाशीवर ड्रोनद्वारे फवारणी करण्यात येणार आहे. राज्यातील पहिला प्रयोग गुरुवारी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कापूस संशोधन विभागाच्या प्रक्षेत्रावर घेण्यात आला. पुढच्या वर्षी विद्यापीठातील संपूर्ण कापूस प्रक्षेत्रावर हा प्रयोग राबविण्याचा मानस आहे.
राज्यात तज्ज्ञ मनुष्यबळ उपलब्ध होत नसून, मजुरांची वानवा आहे. त्यामुळे फवारणीत शेतकरी, शेतमजुरांचे बळी जात आहेत. मात्र या ड्रोनद्वारे १५ मिनिटांत एक एकरावर फवारणी केली जाणार आहे. बॅटरीवर चालणारे हे ड्रोन असून, यामध्ये ‘जीपीएस’ प्रणाली आहे. फवारणी करताना मध्येच औषध किंवा बॅटरी संपली तर पुन्हा त्याच ठिकाणाहून हे यंत्र फवारणीचे अचूक काम सुरू करते. याद्वारे कीटकनाशके पानांना पक्के चिकटते. त्यामुळे किडींचे प्रभावी नियंत्रण होते, अशी माहिती कुलगुरू डॉ. व्ही.एम. भाले यांनी दिली.