मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील कन्येचे 'कस्तुरी'ने केले थाटात लग्न!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 12:24 PM2019-05-15T12:24:22+5:302019-05-15T12:24:28+5:30
येथील कस्तुरी चॅरिटेबल सोसायटीने मोलमजुरी करणाºया कुटुंबातील कन्येच्या लग्नासाठी पुढाकार घेतला.
अकोला: लग्न म्हटले की, तीन-चार लाख रुपये खिशात हवेच. त्यात मुलीचे लग्न म्हटले तर वधूपित्याची मोठी अडचण होते. लग्नासाठी एवढा पैसा आणायचा कोठून, असा प्रश्न अनेक गोरगरीब कुटुंबातील पित्यांना पडतो. अशा परिस्थितीत कुणी मदतीचा हात दिला तर वधूपित्याच्या डोक्यावरचा मोठा भार कमी होतो. येथील कस्तुरी चॅरिटेबल सोसायटीने मोलमजुरी करणाºया कुटुंबातील कन्येच्या लग्नासाठी पुढाकार घेतला. खर्चाची, पाहुण्यांच्या स्वागताची, भोजनाची संपूर्ण जबाबदारी कस्तुरीने उचलून या कन्येचे १२ मे रोजी थाटात लग्न लावून दिले आणि सामाजिक बांधीलकीचा आदर्श घालून दिला.
ज्ञानेश्वर महाराज वाघ यांच्या माध्यमातून तळेगाव बाजार येथील भूमिहीन व मोलमजुरी करणारे रामदास सोनोने हे ‘कस्तुरी’ या सेवाभावी संस्थेच्या संपर्कात आले. त्यांची पत्नी चित्रातार्इंची हृदय शस्त्रक्रिया मुंबईला झाली होती. त्यासाठीही कस्तुरीने आर्थिक मदतीचा हात दिला. एवढेच नाही तर त्यांची सुकन्या दुर्गाच्याही शिक्षण, रोजगार व विवाहाची जबाबदारी कस्तुरीने स्वीकारली. वाणिज्य शाखेची पदवीधर असलेल्या दुर्गाचा अमरावती येथील आशीष वडाणे यांच्यासोबत विवाह जुळला. आशीष वडाणे हे सेन्ट्रल बँकेत कार्यरत आहेत. दोन्ही परिवाराच्या संमतीने १२ मे रोजी कस्तुरीच्या गायगाव मार्गावरील परिसरावर या दोघांचा विवाह सोहळा थाटात पार पडला. विवाह सोहळ्यात वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी भर उन्हात सुमारे ७०० नागरिकांनी हजेरी लावली. कस्तुरीने दुर्गासारख्या मुलीच्या आयुष्यात आनंदच निर्माण केला नाही तर पालकाची भूमिका बजावून तिच्या कुटुंबाला मदतीचा हात दिला. कस्तुरीचे कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे.
विवाह सोहळ्याला मान्यवरांची हजेरी!
विवाह सोहळ्याला माजी आ. वसंतराव खोटरे, डॉ. अशोक ओळंबे, सोनू देशमुख, मोहन महाराज गोंडचवर, सुभाष लोहे, हेमंत जवादे (नागपूर), डॉ. नानासाहेब चौधरी, सोमेश्वर पेठकर, साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक मंडळ मोठी उमरी, कस्तुरीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. किशोर बुटोले, उपाध्यक्ष यशवंत देशपांडे, डॉ. विद्या राऊत, वंदना कुळकर्णी, मीरा देशपांडे, कविता राठोड, शीला गहिलोत, डॉ. शांताराम बुटे, डॉ. रोहिणी तडस, सहसचिव प्रा. मेघा कनकेकर, अमर शर्मा, संजय ठाकरे, शारदा शर्मा, संजय गायकवाड, राजू पेठकर, दमोदर नुपे, चेतना आनंदाणी, सुहास पातुर्डे, कैलास शर्मा, ममता शर्मा, दीपक वाघमारे, संजय बुटोले, जयंत जोशी, सुनील मिटकरी, अतुल कुळकर्णी, पंडित पळसपगार आदींनी हजेरी लावली.