‘काटेपूर्णा’ची नव्वदीकडे वाटचाल; साठा पोहोचला ८६.८१ टक्क्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 01:14 PM2018-08-29T13:14:24+5:302018-08-29T13:17:04+5:30
अकोला: अकोला शहराची लाइफ लाइन काटेपूर्णा धरणात मंगळवार, २८ आॅगस्ट सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत ८६.८१ टक्के जलसाठा संचयित झाला आहे.
अकोला: अकोला शहराची लाइफ लाइन काटेपूर्णा धरणात मंगळवार, २८ आॅगस्ट सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत ८६.८१ टक्के जलसाठा संचयित झाला आहे. नव्वदीकडे ही वाटचाल असून, मागील तीन ते चार वर्षात प्रथम एवढा साठा या धरणात उपलब्ध झाल्याने अकोलेकर, शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. पावसाचा आणखी एक महिना शिल्लक आहे; पण धरण ९५ टक्के पाणी संचयित झाल्यानंतरच वक्रद्वार उघडले जातील.
बार्शीटाकळी तालुक्यातील काटेपूर्णा या मोठ्या धरणात आतमितीस ८६.८१ टक्के जलसाठा आहे. नियमानुसार धरणात ३३ टक्के जलसाठा उपलब्ध असला तर सिंचनासाठी पाणी देता येते. यावर्षी ही आकडेवारी ओलांडल्याने रब्बी व उन्हाळी हंगामातील पिकांना सिंंचनासाठी पाणी सोडण्यात येणार आहे. दरम्यान, पातूर तालुक्यातील निर्गुणा मध्यम धरणातही १०० टक्के जलसाठा संचयित झाला असून, उमा धरण शंभर टक्के पाण्याने भरले आहे. अकोला, बुलडाणा व अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वान धरणात आजमितीस ८६.२३ टक्के जलसाठा उपलब्ध झाल्याने मागील शुक्रवारी या धरणाचे दोन वक्रद्वार उघडण्यात आले होते. या धरणाचे पाणलोट क्षेत्र पर्वतरांगात असून, पडलेला पाऊस थेट धरणात येतो. पाण्याची आवक सुरू च असल्याने या धरणाचे दोन वक्रद्वार उघडावे लागले होते. मोर्णा धरणातही ४८.८२ टक्के जलसाठा संचयित झाला असून, प्रथमच दगडपारव्हा धरणात २३.१५ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. पोपटखेड धरणात ६.२७ टक्के जलसाठा उपलब्ध आहे.
- काटेपूर्णा धरणात आजमितीस सरासरी ८६.८१ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. पावसाचा एक महिना पुढे असल्याने चांगला पाऊस येऊन धरण पूर्ण क्षमतेने भरेल, अशी अपेक्षा आहे; ९५ टक्के जलसाठा उपलब्ध झाल्यास मात्र धरणातील पाण्याचा विसर्ग करावा लागणार आहे.
अभिजित नितनवरे,
उपविभागीय अभियंता,
बोरगाव मंजू विभाग-२, अकोला.