निसर्गप्रेमींना खुणावतेय अकोल्यातील काटेपूर्णा अभयारण्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 04:09 PM2018-06-22T16:09:10+5:302018-06-22T16:09:10+5:30
अकोला: अकोल्यापासून ३0 किमी अंतरावर मंगरूळ रस्त्यावर असलेल्या काटेपूर्णा अभयारण्यात शनिवारी सकाळी भ्रमंतीसाठी काही निसर्गप्रेमी गेलो होतो. आनंदाची बाब म्हणजे या अभयारण्याला मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत सामाविण्यात आले आहे.
- दीपक जोशी
अकोला: अकोल्यापासून ३0 किमी अंतरावर मंगरूळ रस्त्यावर असलेल्या काटेपूर्णा अभयारण्यात शनिवारी सकाळी भ्रमंतीसाठी काही निसर्गप्रेमी गेलो होतो. आनंदाची बाब म्हणजे या अभयारण्याला मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत सामाविण्यात आले आहे. मुख्य वनसंरक्षक रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली खैरनार आणि त्यांची टीम खूप छान काम करीत असल्याचे बघायला मिळाले. आता हे अभयारण्य कात टाकून नव्या जोमाने निसर्ग प्रेमींसाठी सज्ज होत आहे.
अकोल्याहून पहाटे निघताना रोहित पक्ष्यांचे दर्शन व्हावे ही मनीषा उरी बाळगून काही निसर्गप्रेमी निघाले. ८-१0 दिवसांपूर्वीच मुख्य वनसंरक्षक रेड्डींना येथील जलाशयावर फ्लेमिंगो दिसला. सोबत असलेल्या रवी नानोटींचा उत्साह वाढला होता. निसर्गप्रेमींसाठी आकर्षण म्हणून काटेपूर्णाला गेलो. अभयारण्याच्या प्रवेशद्वारावर पोचल्यावर मेडशिंगीच्या वृक्षाने स्वागत केले. मागोमाग दीपक दामोदर, स्वाती दामोदर त्यांच्या दोन कन्यांसह हजर झाले. प्रवेश फी भरून मार्गस्थ झालो. रस्त्यात खूप सारे चितळ दृष्टीस पडले. इतक्यात पावश्या, वरवटे, सातभाई, बुलबुल सोतवाल, शिंपी टकाचोर आदी पक्ष्यांच्या किलबिलाटाने लक्ष्य वेधले. पर्यटन केंद्रात आल्यावर आपटा, तांबडा, कुडा, मेडशिंगी, कुंती ही वृक्षराजी अंगावर कळ्या आणि फुलांची चादर घेऊन बसली होती.
पाणवठ्यावर गायबगळे, टिटव्या वंचक, कंठेरी चिखले, मधूनच पाणभिंगरी, पाकोळी वेडे राघू दयाळ ही मंडळी पाण्यावर शिकारीसाठी घिरट्या घालीत होते. आम्ही मात्र निसर्गप्रेमी फ्लेमिंगो पाहण्याची उताविळ झालो होतो. सर्व दिशांना दुर्बीण फिरवूनही निराशाच पदरी पडली.मृग नक्षत्रातले हे निसर्ग परिवर्तन पाहत पाहत आमची भ्रमंती सुरू होती. सोबतीला मोर, पावश्या, चातक यांचं गायन लक्ष वेधत होतं. मृग नक्षत्र म्हटलं की, दरवर्षी चातक पक्षी आणि मृगकिडे याचं आकर्षण असतं. ते कुठे दृष्टीस पडतात का? हे आम्ही शोधत होतो.
अखेर फ्लोमिंगोचे दर्शन घडलेच नाही!
फ्लोमिंगोंच्या दर्शनाची, पण ती काही सफल झाली नाही. परंतु वन्यजीव विभाग अकोला यांनी फ्लोमिंगोसाठी पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी केलेली तयारी आम्हाला सुखावून गेली. त्यांची ही दूरदृष्टी फ्लोमिंगोंसाठी पोषक राहील आणि काटेपूर्णाच्या जलाशयावर अकोलेकरांना अग्निपंख दर्शनाचा आनंद लुटता येईल.
प्रदुषणामुळे मृगकिडे लुप्त
मृगकिडे शुद्ध वातावरणातचर् ंजन्मतात. डोंगर टेकड्यांवरील माळराने, उतार व पायथयाला ते मृगनक्षत्रातच दिसतात आणि अल्प कालावधीत लुप्त देखिल होतात. वाढत्या प्रदुषणामुळे त्यांचे दिसणे दुर्मिळ होत आहे. पावसाचा संदेश देणारा मृगकिडा शेतकऱ्यांचा मित्र आहे. म्हणूनच निसर्ग जपणे आणि दैनंदिन जीवनात प्रदूषण कमी करणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे, याची जाणीव मानवाला केव्हा होणार?
निसर्गाचा देवदूत : मृगकिडा
काटेपूर्णा अभयारण्याची भटकंती सुरू असताना, दामोदरे यांना मृगकिडा दिसल्यावर आम्ही निसर्गप्रेमीं त्याकडे वळलो. मृग नक्षत्र धरतीच्या कुशीत जन्मलेल्या मृगकिड्याने रक्तवर्णी मखमली साजश्रृंगार केला होता. त्याच्या लाल पाठीवर छोटे उंचवटे होते. कासवासारखी त्याची चाल होती. षटपाद वर्गातील ढेकूण कुळात मृगकिडा गणल्या जातो. समोरच्या सोंडेने तो झाडाच्या खोडातून रस पितो. चिंचोक्याएवढा आकाराचा मृगकिडा अर्धा इंच लांब असतो. पाऊस हा पक्ष्यांसाठी निसर्गाने सुरू केलेला भंडाराच असतो. या दिवसात असंख्य जातीचे किटक निर्माण होत असतात. ते कावळे, चिमण्या, सातभाई, मैना टकाचोर, कोतवाल, नामणी मैना, नीळकंठ, तितिर यांचे भक्ष्य ठरतात. परंतु पैसा नावाचा किडा आणि मृगकिडा यांना कोणी पक्षी खात नाही, हे एक निसर्गाचे आश्चर्यच आहे.