पोळ््याच्या दिवशी कावड-पालखी महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 02:04 AM2017-08-01T02:04:20+5:302017-08-01T02:04:20+5:30
यंदा मात्र शेवटच्या (पाचवा) सोमवारी २१ आॅगस्ट रोजी पोळा सण असून, याच दिवशी कावड-पालखी महोत्सवाचे आयोजन होणार असल्यामुळे शिवभक्त बुचकळ््यात पडले आहेत. एकाच दिवशी दोन मोठे सण आल्यामुळे शिवभक्तांची तारांबळ उडणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
आशिष गावंडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वराला गांधीग्राम येथून पूर्णा नदीच्या पाण्याने जलाभिषेक करण्याची परंपरा आहे. राज्यातील एकमेव कावड-पालखी महोत्सवात हजारो शिवभक्त सहभागी होतात. यंदा मात्र शेवटच्या (पाचवा) सोमवारी २१ आॅगस्ट रोजी पोळा सण असून, याच दिवशी कावड-पालखी महोत्सवाचे आयोजन होणार असल्यामुळे शिवभक्त बुचकळ््यात पडले आहेत. एकाच दिवशी दोन मोठे सण आल्यामुळे शिवभक्तांची तारांबळ उडणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी शहरापासून १८ किमी अंतरावर असलेल्या गांधीग्राम येथील पूर्णा नदीचे पवित्र पाणी कावडद्वारे आणून आराध्य दैवत श्री राजराजेश्वराला जलाभिषेक करण्याची परंपरा मागील ७१ वर्षांपासून सुरू आहे. कावडसह शहराच्या कानाकोपºयातून असंख्य पालख्या गांधीग्रामकडे रवाना होतात. गांधीग्राम येथून खांद्यावर जलाचे कलश घेऊन शिवभक्त सोमवारी पहाटेपासूनच अकोल्यात दाखल होतात. शहरातील कावड-पालखी सोहळा पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपºयातून भाविकांची गर्दी होते. श्रावण महिन्याची चाहून लागताच तयारीसाठी शिवभक्तांची दोन महिन्यांपासूनच लगबग सुरू होते. शेवटच्या सोमवारी विविध देखावे, देवी-देवतांच्या प्रतीकात्मक मूर्ती, सामाजिक बंधुभाव जपणारे संदेश भाविकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरतात. अनेकदा श्रावण महिन्यात चार सोमवार येतात. त्यामुळे चौथ्या सोमवारी कावड-पालखी सोहळा गृहीत धरून शिवभक्त कामाला लागतात. यंदा श्रावण महिन्यात पाच सोमवार असून, शेवटच्या सोमवारी (२१ आॅगस्ट) पोळा सण आहे. त्यामुळे नेमक्या कोणत्या सोमवारी कावड महोत्सव आहे, असा सवाल शिवभक्तांमध्ये उपस्थित झाला होता. श्री राजेश्वर शिवभक्त मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत सावजी यांनी पाचव्या सोमवारी कावड-पालखी महोत्सव पार पडणार असल्याचे स्पष्ट केले आहे.