कावडधारी शिवभक्तांची वाट यंदाही बिकटच; अकोला-गांधीग्राम मार्गाची दूरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 12:00 PM2019-08-13T12:00:50+5:302019-08-13T12:08:16+5:30
जवळपास दीड वर्षांपासून निर्माणाधीन असलेल्या या मार्गावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे आहेत, तर काही ठिकाणी पुलांचे बांधकाम अर्धवट आहे.
अकोला : ऐतिहासिक कावड महोत्सवात यंदाही शिवभक्तांसमोर निर्माणाधीन रस्त्याची मोठी समस्या आहे. विशेष म्हणजे, पाच किलोमीटरपर्यंतचा मार्ग खडकांची चुरी, खडक अन् खड्ड्यांचा असल्याचे वास्तव आहे. अशा परिस्थितीत हा मार्ग कावडधारी शिवभक्तांसाठी जीवघेणा ठरत असला, तरी त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.
श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी अकोल्यात ऐतिहासिक कावड महोत्सव मोठ्या हर्षोल्हासात साजरा केला जाणार आहे. श्री राजराजेश्वराच्या जलाभिषेकासाठी शिवभक्त कावडीद्वारे गांधीग्राम येथून पूर्णानदीचे जल आणणार आहेत; परंतु त्यांची ही वाट बिकट ठरणार आहे. जवळपास दीड वर्षांपासून निर्माणाधीन असलेल्या या मार्गावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे आहेत, तर काही ठिकाणी पुलांचे बांधकाम अर्धवट आहे. शिवभक्तांना यातून मार्ग काढता आला, तरी रस्त्यावरील खडक आणि खडकांची बारीक चुरी धोकादायक ठरत आहे. गतवर्षीदेखील हीच समस्या असल्याने शेकडो शिवभक्तांच्या पायांना दुखापत झाल्याचे उघडकीस आले होते. हीच स्थिती यंदाही कायम असल्याने हा प्रकार शिवभक्तांच्या जीवावर बेतणारा ठरू शकतो.
महोत्सवाला १४ दिवसांचा अवधी
श्री राजराजेश्वरनगरी श्रावणातील चौथ्या सोमवारी होऊ घातलेल्या ऐतिहासिक कावड महोत्सवाला अवघ्या १४ दिवसांचा अवधी शिल्लक आहे; परंतु कावड मार्गाची सद्यस्थिती अत्यंत दयनीय असून, निदान कावड मार्गाची दुरुस्ती करणे अपेक्षित आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या मार्गाच्या दुरुस्तीबाबत सूचना दिली आहे; मात्र या सूचनेवर प्रत्यक्ष कृतीला अद्याप सुरुवात झालेली दिसत नाही. त्यामुळे या चौदा दिवसांमध्ये प्रशासनाकडून या मार्गाची दुरुस्ती होईल का, याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.
गतवर्षी शिवभक्तांच्या पायांना दुखापत
गतवर्षीदेखील हीच स्थिती कावड मार्गाची होती. कावड आणि पालखीद्वारे पूर्णा नदीचे पाणी जलाभिषेकासाठी खांद्यावर वाहून आणणाºया हजारो शिवभक्तांचे पाय रस्त्यावरील खडक व खडकांच्या चुरीमुळे जखमी झाले होते.
अशी आहे कावड मार्गाची स्थिती
गांधीग्राम येथून निघाल्यावर डांबरी रस्ता बºयापैकी चांगला आहे; मात्र यादरम्यान चार ठिकाणी पुलाचे बांधकाम सुरू असल्याने वळण मार्ग काढण्यात आला आहे. वळण मार्ग अरुंद आणि खडकाच्या बारीक चुरीचा असल्याने तो धोकादायकच आहे. येथून पुढे कासली फाट्यापर्यंत पोहोचल्यावर रस्त्याचे खोदकाम केलेले आहे. हा दोन-अडीच किलोमीटरचा मार्ग कावडधारी शिवभक्तांसाठी खडतर ठरणार आहे. या मार्गावर मातीपेक्षा खडक आणि खड्डे जास्त असल्याने हा मार्ग घातक ठरत आहे. येथून पुढे उगवा फाट्यापर्यंत जवळपास एक किलोमीटरपर्यंतच्या रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्यामुळे काही प्रमाणात शिवभक्तांना दिलासा मिळणार; पण यातील काही अंतर हे एकेरी असल्याने मोठ्या कावडधारी शिवभक्त मंडळांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. उगवा फाट्यापासून पुढे रेल्वे पुलापर्यंत मार्गाची स्थिती चांगली आहे. येथून पुन्हा सांगवी मोहाडी फाट्यापर्यंत कच्चा रस्ता असून, यावर माती आणि खडी असल्याने शिवभक्तांच्या पायांना इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हीच स्थिती सुकोडा फाट्यापासून ते अकोट फैलपर्यंत आहे. पुढे शहरात प्रवेश केल्यावर टिळक रोड मार्गावर खड्डे असल्याने शिवभक्तांची वाट बिकटच आहे.
रेल्वे पुलाजवळच्या वळणावर शिवभक्तांची कसोटी
सुकोडा फाट्यापासून ते सांगवी मोहाडी फाट्यापर्यंत दोन्ही बाजंूनी सिमेंट काँक्रिट मार्गाचे काम पूर्ण झालेले आहे. तेथून देवी मंदिरापूर्वीच्या वळणापर्यंत मात्र सिमेंट काँक्रिटीकरण झालेले नाही. अकोला-अकोट रेल्वे मार्गाच्या पुलाखालून जाणारा हा वळण मार्ग केवळ खडीकरण केलेला असून, यावर बारीक खडी पावसामुळे उघडी पडली आहे. अंदाजे पाचशे मीटर असलेल्या या मार्गावरून अनवाणी जाणे कावडधारींना जिकिरीचे ठरणार आहे. बारीक खडी पायात रुतून त्यांना जखमाही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पुलांचे काम अपूर्ण; वळण मार्ग जोखमीचे
सुकोडा फाट्यापासून सुरू होणाºया या मार्गाचे काँक्रिटीकरण उगवा फाट्यापासून पुढे एक किलोमीटर अंतरापर्यंत झालेले आहे. या मार्गाचे काम सुरू असले, तरी चार ठिकाणी छोट्या पुलांचे काम अपूर्णच आहे. या पुलांजवळून वळण मार्ग काढण्यात आले असून, केवळ खडीकरण असलेल्या या मार्गावरून जाणे कावडधारी शिवभक्तांसाठी जोखमीचे ठरू शकते.
शहरातील मार्गांवरही दिलासा नाहीच!
गांधीग्रामकडून येणाºया कावडधारींची वाट शहरातही बिकटच राहणार असल्याची चिन्हे आहेत. कावडधारी अकोट फैलातून आल्यावर रेल्वे उड्डाणपुलावर शिवाजी महाविद्यालयासमोरून टिळक मार्गाकडे प्रयाण करतात; परंतु या मार्गावरही अनेक ठिकाणी खड्डे व बारीक खडी असल्यामुळे कावडधारींना शहरात आल्यानंतरही दिलासा मिळणार नाही. शासकीय तंत्र विद्यालयासमोरच मोठा खड्डा खोदून ठेवला आहे. या खड्ड्याजवळून वाट काढतानाही कावडधारी मंडळींना बरीच कसरत करावी लागणार आहे.
टिळक मार्गावरही खड्डे
सिटी कोतवाली पोलीस ठाणे ते शिवाजी महाविद्यालयापर्यंतच्या मार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण प्रस्तावित असला तरी सध्या शासकीय तंत्र विद्यालयापर्यंतच काँक्रिटीकरण झालेले आहे. त्यापुढे शिवाजी महाविद्यालयापर्यंतचा रस्ता जागोजागी उखडला असून, या मार्गाची थातूरमातूर डागडुजी करण्यात आली आहे. पावसामुळे बारीक खडी उघडी पडल्याने या मार्गावरून चालणे जिकिरीचे ठरत आहे. दीपक चौकापासून पुढे सिटी कोतवालीपर्यंत काँक्रिटीकरण झालेले असले, तरी माळीपुरा चौक ते त्रिवेणीश्वर संकुलापर्यंतचे काँक्रिटीकरण होणे अद्याप बाकी आहे. या रस्त्याची पुरती वाट लागलेली असून, मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. संपूर्ण टिळक मार्गावर दुभाजकाच्या मोकळ्या जागेत मुरूम व मातीचा भराव टाकण्यात आला आहे.