कावड, पालखी महोत्सव; १४० पेक्षा जास्त पालख्यांची नोंदणी पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 01:16 PM2019-08-25T13:16:20+5:302019-08-25T13:16:33+5:30
जिल्ह्यातील १४० पेक्षा जास्त पालखी मंडळांनी श्री राजेश्वर शिवभक्त मंडळाकडे नोंदणी केली आहे.
अकोला : श्री राजराजेश्वर शिवभक्त मंडळातर्फे यंदा कावड, पालखी महोत्सवाचा अमृत सोहळा सोमवार, २६ आॅगस्ट रोजी साजरा करण्यात येत आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील १४० पेक्षा जास्त पालखी मंडळांनी श्री राजेश्वर शिवभक्त मंडळाकडे नोंदणी केली आहे. याशिवाय, शंभरपेक्षा जास्त कावड मंडळांचा सहभाग राहणार आहे.
अकोल्यातील ऐतिहासिक कावड, पालखी महोत्सवाला यावर्षी ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे यंदा कावड, पालखी महोत्सवाची विशेष तयारी करण्यात आली आहे. या अमृत महोत्सवात शिवभक्तांना नावीन्यपूर्ण आकर्षक झाकीचे दर्शन होणार आहे. या झाकीच्या माध्यमातून विविध सामाजिक संदेश दिले जाणार आहेत. रविवारी रात्री गांधीग्राम येथून श्री राजराजेश्वराची पालखी निघाल्यावर रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने फटाक्यांची आतषबाजी केली जाणार आहे. पालखी मार्गावर ठिकठिकाणी शिवभक्तांचे स्वागत करण्यात येणार आहे. शहरात आगमन झाल्यावर चौका-चौकांत शिवभक्तांच्या स्वागतासोबतच प्रसादाचेही आयोजन शिवभक्तांमार्फत करण्यात आले आहे. या ऐतिहासिक अमृत महोत्सवात श्री राजराजेश्वराच्या पालखीवर ड्रोनद्वारे पुष्पवृष्टी केली जाईल. तसेच महोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे शेगाव येथील संत गजानन महाराज, संस्थानची दिंडी राहणार आहे. यामध्ये १०० वारकऱ्यांचा असणार सहभाग. शिव-पार्वती, श्रीगणेश व कार्तिकेय यांची झाकीदेखील लक्षवेधी ठरणार आहे.
पालखी मार्ग खडतरच!
पालखी मार्गाचे निर्माण कार्य सुरू असल्याने ठिकठिकाणी रस्त्यावर खड्डे आणि खडकांची चुरी आहे. आठवडाभरात या मार्गाची स्वच्छता करण्यात आली असून, काही प्रमाणात डागडुजी करण्यात आली आहे. असे असले, तरी पालखी वास्तविकतेमध्ये शिवभक्तांसाठी पालखी मार्ग खडतरच ठरणार आहे.