मूलभूत सुविधांची कामे सुरू ठेवा!
By admin | Published: September 14, 2016 01:54 AM2016-09-14T01:54:46+5:302016-09-14T01:54:46+5:30
अकोला मनपा क्षेत्रात समाविष्ट भागातील कर्मचा-यांना आयुक्तांची सूचना.
अकोला, दि. १३ : महापालिका क्षेत्रात समाविष्ट झालेल्या २४ गावांतील मूलभूत सुविधांची कामे काही दिवसांपासून बंद पडली. दैनंदिन साफसफाई, घंटा गाडी, पथदिव्यांची सुविधा, पाणीपुरवठा आदी कामांवर नियुक्त कर्मचार्यांनी मनपा प्रशासनाचे कोणतेही निर्देश नसताना हात आखडता घेतला. त्यामुळे मलकापूर, खडकी, भौरद, मोठी उमरी परिसरातील कामे प्रभावित झाल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केल्यानंतर महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी मूलभूत सुविधांची कामे पूर्ववत सुरू ठेवण्याची सूचना संबंधित कर्मचार्यांना केली आहे.
महापालिका क्षेत्राची हद्दवाढ होऊन शहरात २४ गावांचा समावेश झाला. यामध्ये १३ प्रमुख ग्रामपंचायतींचा समावेश आहे. हद्दवाढीची अधिसूचना जारी होताच आयुक्त अजय लहाने यांनी जिल्हा परिषद प्रशासनासोबत समन्वय साधून ग्रामपंचायतींमधील सर्व विभागांचे दस्तावेज व माहिती जमा करण्याचे काम सुरू केले. पाणीपुरवठा विभाग, जन्म-मृत्यू नोंदणी विभाग, बांधकाम विभाग, नगररचना विभाग, लेखा विभाग,आरोग्य विभाग, मालमत्ता कर वसुली विभागाचे दस्तावेज ताब्यात घेतले. सोबतच ग्रामपंचायतींमध्ये आस्थापनेवर सेवारत तसेच मानधन तत्त्वावरील कर्मचार्यांचे दस्तावेज जमा करण्यात आले. ग्रामपंचायतींच्या सेवारत कर्मचार्यांना महापालिकेच्या आस्थापनेवर सामावून घेतल्या जाईल.
शिवाय मानसेवी कर्मचार्यांना पूर्ववत कायम ठेवण्याची चिन्हे असतानाच अचानक संबंधित कर्मचार्यांनी मनपाच्या पूर्वसूचनेशिवाय मूलभूत सुविधांची कामे बंद केली. परिणामी दररोज घंटा गाडीद्वारे जमा होणारा कचरा परिसरात साचू लागला. पाणीपुरवठय़ाचे वेळापत्रक कोलमडले. जन्म-मृत्यू नोंदणीची कामे प्रभावित झाली. ही बाब लक्षात घेता आस्थापनेवर असो वा मानसेवी संबंधित कर्मचार्यांनी त्यांची कामे कायम सुरू ठेवण्याचे निर्देश आयुक्त लहाने यांनी दिले आहेत.
मनपाची घंटा गाडी सुरू करणार?
मनपात समाविष्ट झालेल्या मलकापूर, मोठी उमरी, खडकी, भौरद आदी भागांत सायकल रिक्षाद्वारे नागरिकांच्या घरोघरी जाऊन कचरा जमा केला जात होता. संबंधित कर्मचार्यांनी काम बंद केले. ही कामे पूर्ववत सुरू ठेवण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले असले तरी मनपाकडे उपलब्ध घंटा गाड्यांची संख्या पाहता शहरानजीकच्या भागात घंटा गाड्या पाठविण्याचा प्रस्ताव प्रशासनाच्या विचाराधीन आहे.
काम हवे, तर काम करा!
शहरालगतच्या प्रमुख १३ ग्रामपंचायतींमधून आस्थापनेवर ६१, तर मानधनावर ४0 कर्मचारी सेवारत असल्याचे मनपाच्या तपासणीत आढळून आले. आस्थापनेवरील कर्मचार्यांना मनपात सामावून घेतल्या जाईल, यात दुमत नाही; परंतु कामात चोख असणार्या मानसेवी कर्मचार्यांना पुन्हा सेवेची संधी मिळू शकते. त्यासाठी काम हवे, तर काम करा, असे संकेत प्रशासनाने दिले आहेत