डेंग्यूसदृश आजाराचा बंदोबस्त करा - आढावा बैठकीत महापौरांचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 12:18 PM2018-08-24T12:18:38+5:302018-08-24T12:21:37+5:30
अकोला : शहराच्या विविध भागात डेंग्यूसदृश आजाराने अकोलेकर फणफणत असताना महापालिकेचा वैद्यकीय आरोग्य विभाग कागदोपत्री जनजागृती मोहीम व उपाययोजना राबवित असल्याचे चित्र आहे.
अकोला : शहराच्या विविध भागात डेंग्यूसदृश आजाराने अकोलेकर फणफणत असताना महापालिकेचा वैद्यकीय आरोग्य विभाग कागदोपत्री जनजागृती मोहीम व उपाययोजना राबवित असल्याचे चित्र आहे. डेंग्यूसह डासांनी चावा घेतल्यामुळे विविध साथ रोगांनी बेजार झालेल्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केल्यानंतर गुरुवारी महापौर विजय अग्रवाल यांनी वैद्यकीय आरोग्य विभागाचा आढावा घेऊन डेंग्यूसदृश आजाराचा बंदोबस्त करण्याचे निर्देश दिले. उप महापौर वैशाली शेळके यांनीसुद्धा मनपा आयुक्तांना पत्र सादर करीत परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याची सूचना केली.
मनपाच्या मलेरिया विभागाच्या निष्क्रियतेमुळे शहरात डेंग्यूच्या आजाराने प्रवेश केला असून, शहरातील खासगी रुग्णालयांत डेंग्यूसदृश रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. मागील सहा वर्षांपासून अकोलेकरांना डेंग्यूसदृश आजाराने हैराण करून सोडले आहे. पावसाळा सुरू होताच डेंग्यू, मलेरियाच्या आजारांत वाढ होत असल्याचे दरवर्षीचे चित्र आहे. पावसाच्या साचून असलेल्या तसेच घरातील कुलर, फुलदाणी, सडके टायर यांसह विविध ठिकाणच्या पाण्यात ‘एडिस एजिप्ताय’ या डासांची उत्पत्ती होते. डेंग्यू किंवा मलेरिया झालेले अनेक रुग्ण शासकीय रुग्णालयांमध्ये दाखल न होता खासगी रुग्णालयात दाखल होत असून, अशा रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याची माहिती आहे. जीवघेण्या डेंग्यूचा धोका ओळखून मनपाच्या मलेरिया विभागासह वैद्यकीय आरोग्य यंत्रणेने वेळीच उपाययोजना राबवणे अपेक्षित असताना संबंधित विभाग कमालीचे निष्क्रिय ठरत आहेत. डासांची पैदास रोखण्यासाठी प्रभागांसह घरा-घरांमध्ये धुरळणी करणे व साचलेल्या पाण्यांमध्ये औषध फवारणी करून पाणी वाहते करण्यासाठी मनपा प्रशासनाने प्रभावी मोहीम राबवण्याची गरज असताना सर्व सोपस्कार कागदोपत्री पार पाडल्या जात आहेत. त्याचे परिणाम अकोलेकरांना भोगावे लागत असल्याचे चित्र आहे. या मुद्यावर महापौर विजय अग्रवाल यांनी मलेरिया विभागाची बैठक घेऊन त्यांना तातडीने उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले आहेत.
महापौर साहेब, आवर कसा घालणार?
शहरात दरवर्षी डेंग्यूसदृश आजाराचा उद्रेक होतो. ही बाब लक्षात घेऊन मनपाच्या मलेरिया विभागाकडून वेळीच उपाययोजना केली जात नाही. मलेरिया विभागाकडे फॉगिंग- फवारणी मशीन, मनुष्यबळाचा अभाव आहे. अशा स्थितीत हा विभाग ऐनवेळेवर डेंग्यूच्या साथ रोगाला कसा आवर घालणार, असा प्रश्न महापौरांच्या आढावा बैठकीनंतर उपस्थित होत आहे.
या भागात साचले पाणी
शहरातील पाणथळ भागात पावसाचे पाणी दोन-दोन महिन्यांपर्यंत जमिनीत मुरत नाही. अशा पाण्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आदर्श कॉलनी, व्हीएचबी कॉलनी, टीटीएन कॉलेज, मलकापूर परिसरासह राष्ट्रीय महामार्गावरील नवीन किराणा मार्केटच्या भागात पाणथळ जमिनीवर साचलेल्या पाण्यात प्रशासनाने औषध टाकण्याची गरज आहे.