रंगाचा होऊ देऊ नका भंग...रंगोत्सव करा जपून साजरा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 04:41 PM2018-02-26T16:41:25+5:302018-02-26T16:41:25+5:30
अकोला: होळीच्या उत्सवाला विजेच्या अपघाताने गालबोट लागू नये यासाठी होळी पेटवितांना संभाव्य अपघात टाळण्याकरिता आवश्यक ती खबरदारी घेत होळीचा आनंद द्विगुणित करण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
अकोला: होळीच्या उत्सवाला विजेच्या अपघाताने गालबोट लागू नये यासाठी होळी पेटवितांना संभाव्य अपघात टाळण्याकरिता आवश्यक ती खबरदारी घेत होळीचा आनंद द्विगुणित करण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
होळी पेटविताना सभोवताली वीजवाहिन्या किंवा वितरण रोहीत्रे नाहीत याची खातरजमा करून घ्या, अन्यथा होळीच्या ज्वाळांनी वीजवाहिन्या वितळून जीवंत तार खाली पडून भीषण अपघात होण्याची शक्यता असते. याशिवाय अनेक ठिकाणी वीजवाहिन्या ह्या भुमिगत असल्याने, त्यापासून लांब अंतरावरच होळी पेटवावी जेणेकरून होळीच्या उष्णतेपासून भुमिगत वीजवाहिन्या सुरक्षित राहतील, होळी पेटविताना शक्यतो मोकळ्या जागेचा वापर करा, ट्रक किंवा इतर वाहनांतून होळी आणताना होळीचा स्पर्श रस्त्यालगतच्या वीजवाहिन्यांना होणार नाही याची खबरदारी घ्या, विजेचे अपघात हे प्राणघातक असल्याने एक चूकही प्राणांतिक अपघातास कारणीभूत ठरू शकते.
त्याचप्रमाणे रंगोत्सव साजरा करताना पाण्याचे फवारे वीजवाहिन्यापर्यत उडणार नाही याची काळजी घ्या. रंग भरलेले फुगे फेकताना ते वीजेचे खांब आणि वीजवाहिन्या यांना लागणार नाही याची खबरदारी घ्या. विज वितरण यंत्रणेचे रोहीत्रे व तत्सम वितरण उपकरणे बसविलेल्या जागेपासून लांब अंतारावरच रंग खेळा. रंग खेळताना ओल्याचिंब शरीराने वीज खांबाला स्पर्श झाल्यास अपघाताचा संभाव्य धोका असल्याने वीजेचा खांबांना स्पर्श करू नका. वीजेच्या खांबाभोवती पाण्याचा निचरा होणार नाही याची खबरदारी घ्या. घरात होळी खेळताना वीज मिटर, वीजेचे प्लग, वीजतारा आणि वीज उपकरणांचा पाण्यापासून बचाव करा, ओल्या हाताने वीजेच्या बटनांना स्पर्श करू नका. होळीचा सण हा आनंदाचा रंगोत्सव असल्याने खबरदारी घेऊन होळीचा सण साजरा करून आनंद द्विगुणीत करण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
अशी घ्या काळजी!
वीज वितरण यंत्रणेपासून लांब अंतरावर होळी पेटवा.
होळी आणतांना तीचा स्पर्श वीज वाहिन्यांना होऊ नये.
वीज वाहिन्या, वितरण रोहीत्रांवर पाणी फेकू नका.
ओल्या शरीराने वीज उपकरणांना स्पर्शकरू नका.
वीज खांबाभोवती पाण्याचा निचरा करु नका.