रास्त भाव धान्य दुकानांच्या तपासणीकडे कानाडोळा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 10:54 AM2020-08-28T10:54:40+5:302020-08-28T10:55:01+5:30
रास्त भाव दुकानांच्या तपासणीचे अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी (डीएसओ) कार्यालयाकडे सादर करण्यात आले नसल्याची बाब समोर आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत जिल्ह्यातील रास्तभाव धान्य दुकानांच्या तपासणीकडे कानाडोळा करण्यात आला असून, उद्दिष्टानुसार रास्त भाव दुकानांच्या तपासणीचे अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी (डीएसओ) कार्यालयाकडे सादर करण्यात आले नसल्याची बाब समोर आली आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत दरमहा रास्तभाव धान्य दुकानांची तपासणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी करणे आवश्यक आहे. त्यानुसार पुरवठा विभागांतर्गत प्रत्येक तालुक्यात पुरवठा निरीक्षक व निरीक्षण अधिकाऱ्यांमार्फत जिल्ह्यातील रास्तभाव धान्य दुकानांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयामार्फत निश्चित करण्यात आले आहे; परंतु कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर मार्च ते आॅगस्ट या सहा महिन्यांच्या जिल्ह्यातील रास्तभाव धान्य दुकानांची तपासणी करण्याच्या कामाकडे कानाडोळा करण्यात आला.
त्यामुळे जिल्ह्यातील रास्तभाव धान्य दुकानांमधील दरमहा दुकानात प्राप्त होणारा धान्यसाठा, प्राप्त साठ्यापैकी शिधापत्रिकाधारकांना वितरित धान्यसाठा, दुकानात शिल्लक धान्यसाठा, रजिस्टरमधील नोंदी व इतर प्रकारच्या तपासणीचे काम प्रलंबित असल्याने, गेल्या सहा महिन्यातील रास्तभाव धान्य दुकानांच्या तपासणीचे अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडे प्राप्त होणे अध्याप प्रलंबित आहे.
त्यामुळे कोरोना काळात जिल्ह्यातील रास्तभाव धान्य दुकानांच्या तपासणीकडे संबंधित कानाडोळा करण्यात आल्याचे वास्तव समोर येत आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या परिस्थितीत गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत उद्दिष्टानुसार जिल्ह्यातील रास्तभाव धन्य दुकानांच्या तपासणीचे अहवाल संबंधित अधिकाºयांकडून अध्याप प्राप्त झाले नाही.
-बी. यू . काळे
जिल्हा पुरवठा अधिकारी.