अत्युच्च ध्येय ठेवा आणि ते गाठण्याचा प्रयत्न करा - विजय मुनिश्वर
By admin | Published: October 10, 2014 11:13 PM2014-10-10T23:13:46+5:302014-10-10T23:45:57+5:30
सीबीएसई क्लस्टर-९ टेबल टेनिस स्पर्धेचा अकोल्यात शानदार शुभारंभ.
अकोला : पूर्वीच्या तुलनेत आता खेळांप्रती विद्यार्थ्यांची रुची वाढत चालली आहे. खेळाला आलेले ग्लॅमर आकर्षित करीत आहे; परंतु आपला खेळ हा देशासाठी सर्मपित असला पाहिजे. खेळात अ त्युच्च ध्येय ठेवा आणि ते गाठण्यासाठी आटोकाट प्रयत्न करा, असे आवाहन विदर्भातील पहिले अर्जुन पुरस्कार विजेते खेळाडू विजय मुनिश्वर यांनी शुक्रवारी अकोल्यात केले.
प्रभात डे बोर्डिंग स्कूल येथे आयोजित सीबीएसई क्लस्टर - ९ टेबल टेनिस स्पर्धेचे उद्घाटन विजय मुनिश्वर यांच्या हस्ते झाले. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी खेळांमधून संघ भावना, राष्ट्रीय एकात्मता आदी गुण शिकण्यास मिळतात, त्याचा उपयोग जीवनात होतो, असे सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील होते. याप्रसंगी मंचावर सीबीएसईचे निरीक्षक इंद्रजित बासू, टेबल टेनिसचे मुख्य पंच रोहित शिंदे, प्राचार्य कांचन पटोकार, स्कूल ऑफ स्कॉलर्सचे प्राचार्य सुरेश लकडे, गणेश मंगरुळकर, प्रभात किड्सचे संचालक डॉ. गजानन नारे आदी मान्यवर उपस्थित होते. आरंभी खेळाडूंचे पथसंचलन झाले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करण्यात आली. ध्वजारोहण आणि घंटानाद करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र गीत आणि गुजरात गीत सादर करण्यात आले. यावेळी सहा राज्यातील खेळाडू, प्रशिक्षक, शिक्षक तसेच विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.