संवाद अन् सकारात्मक विचारातून राखा मानसिक आरोग्य!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 10:31 AM2020-10-10T10:31:54+5:302020-10-10T10:32:27+5:30
World Mental health Day कोरोनाचा हा काळ परीक्षेचा असून, प्रत्येकाने सावधगिरीने वाटचाल करण्याची गरज आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: कोरोनाकाळात लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांचाच ताणतणाव वाढला असून, अनेक जण नैराश्येच्या गर्तेत खेचल्या गेले आहेत. शिवाय, कोरोनाविषयी असलेल्या विविध गैरसमजांमुळे अनेकांमध्ये फोबियाचेही लक्षणं दिसू लागली आहेत. अशा परिस्थितीत कौटुंबिक संवाद अन् सकारात्मक विचार यातूनच मानसिक आरोग्य राखणे शक्य आहे, असे मानसोपचार तज्ज्ञांचे मत आहे.
कोरोना काळातील चार महिने जवळपास सर्वच व्यवहार ठप्प होते. परिणामी, अनेक जण बेरोजगार झाले. लॉकडाऊनमुळे उत्पन्नाचे पर्यायी साधनंही नसल्याने चिंता वाढली. कुटुंबातील सर्व सदस्य एकाच छताखाली असूनही मोबाइल अन् सोशल मीडियामुळे एकमेकांपासून दूर गेले. त्यामुळे एकटेपणा वाढून चिमुकल्यांसह वयोवृद्धांमध्येही चिडचिड अन् बेचैनीचे वातावरण पसरले. त्याचा थेट परिणाम मानसिक आरोग्यावर होऊ लागले असून, अनेकांमध्ये नैराश्य, फोबिया, चिंता यासारख्या मानसिक आजाराची लक्षणं आढळून येत आहेत. मानसोपचार तज्ज्ञांच्या मते कोरोनाचा हा काळ परीक्षेचा असून, प्रत्येकाने सावधगिरीने वाटचाल करण्याची गरज आहे, तसेच मानसिक आरोग्य राखण्यासाठी नागरिकांनी कौटुंबिक संवाद वाढवून सकारात्मक विचार सरणीचा अवलंब करावा, असे आवाहन मनोविकार तज्ज्ञांनी दिले आहे.
हे करा
- योग, व्यायाम करा.
- कुटुंबातील सदस्यांसोबत संवाद साधा.
- लहान मुलांसोबत वेळ घालवा.
- नकारात्मक विचारांऐवजी सकारात्मक विचारांकडे लक्ष केंद्रित करा.
- नावीन्यपूर्ण उपक्रम राबवा.
- पुस्तक वाचा.
या समस्या येत आहेत समोर
कोरोना काळात अनेकांमध्ये नैराश्याचे वातावरण आहेच, शिवाय काही रुग्णांमध्ये मेंदु विकार असल्याचेही आढळून आले आहे. ही सुरुवात असून, आणखी काही मानसिक समस्या समोर येण्याची शक्यता असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांनी सांगितले.
कोरोनाचा सर्वच घटकांवर परिणाम झाला. त्यामुळे मानसिक ताणतणाव, चिंता, नैराश्य अन् त्यातून होणारी चिडचिड याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे; मात्र हा परीक्षेचा काळ असून, प्रत्येकाने सावधगिरीने यातून पुढे जाण्याची गरज आहे. त्यासाठी प्रत्येकाने कौटुंबिक संवाद वाढविणे आवश्यक असून, सकारात्मक विचारसरणीतून पुढील वाटचाल करण्याची गरज आहे.
- डॉ. अनुप राठी,
मानसोपचार तज्ज्ञ, अकोला.
तणावमुक्तीसाठी हे करताहेत डॉक्टर्स
साधारणत: २४ वर्षांखालील व्यक्तींना मानसिक थकवा जाणवतो. यातील ५० टक्के मानसिक थकवा हा १४ वर्षाखालील मुलांना होतो. मुलांमध्ये नैराश्य, कुठल्याही गोष्टीत उत्साह नसणे, एखाद्या गोष्टीविषयी फार जास्त भीती वाटणे किंवा अभ्यासात मागे पडणे, एकटेपणात जास्त वेळ घालवणे, अशी लक्षणे आढळताच पालकांनी मुलांना डॉक्टरकडे घेऊन जाणे आवश्यक आहे.
- डॉ. नरेंद्र राठी, बालरोग तज्ज्ञ, अकोला.