नियमांचे पालन होत नसल्यास रुग्णांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:18 AM2021-05-23T04:18:01+5:302021-05-23T04:18:01+5:30
अकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा वाढता कहर लक्षात घेता, कोरोनाबाधित रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून नियमांचे पालन ...
अकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा वाढता कहर लक्षात घेता, कोरोनाबाधित रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून नियमांचे पालन होत नसल्यास आता गृह विलगीकरणात रुग्णांना ठेवण्याची पद्धत बंद करून, प्रत्येक गावांत संस्थात्मक विलगीकरणात रुग्णांना ठेवून उपचार देण्यास सुरवात करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शनिवारी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवनात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, विश्वनाथ घुगे तसेच सर्व उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी आदी उपस्थित होते. यावेळी तालुका व गावनिहाय कोरोना विषाणू संसर्गाचा आढावा घेण्यात आला.
जिल्ह्यातील उपविभाग, तालुका आणि गावपातळीवर सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. त्यासाठी दररोज तालुकास्तरावर बैठका घेऊन आढावा घ्यावा व दररोजच्या कामाचे नियोजन करावे. प्रत्येक गावात होत असलेल्या विवाह समारंभावर लक्ष ठेवून जादा संख्या असल्यास कारवाई करावी. प्रत्यक्ष गावातील जबाबदारी ही स्थानिक ग्रामपंचायतीची असून अन्य यंत्रणा त्यांना मदतीसाठी उपलब्ध असतील. बहुतेक ठिकाणी गृह विलगीकरणामधील रुग्ण कोविड नियमांचे पालन करत नसतील तर अशा रुग्णांना संस्थात्मक विलगीकरणात आणून उपचार करा. याबाबत गावातील लोकांकडून प्रतिसाद नसल्यास संबंधित गावातच संस्थात्मक विलगीकरणाची सुविधा तयार करून रुग्णांना तेथे उपचारासाठी न्यावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिले.
‘फिजिकल डिस्टन्सिंग‘चे पालन
होत नसल्यास कारवाई करा!
कडक निर्बंधांमधून सूट दिलेल्या सकाळच्या कालावधीत ग्रामीण भागात ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चे पालन होत नसल्यास कारवाई करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. कृषी सेवा केंद्र व बँकांमधील गर्दीचे नियमन करण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या.
C