विनाकारण फिरणार्या १५० जणांची केली कोविड टेस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:19 AM2021-05-06T04:19:21+5:302021-05-06T04:19:21+5:30
पोलिसांनी राबविली शहरात मोहीम; पॉझिटिव्ह येणाऱ्यांना करणार जीएमसीमध्ये दाखल अकोला : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा प्रादुर्भाव हाताबाहेर जात असतानाही नागरिक ...
पोलिसांनी राबविली शहरात मोहीम; पॉझिटिव्ह येणाऱ्यांना करणार जीएमसीमध्ये दाखल
अकोला : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा प्रादुर्भाव हाताबाहेर जात असतानाही नागरिक मात्र गांभीर्याने वागत नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांनी शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची कोविड टेस्ट सुरू केली आहे. टेस्ट केल्यानंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांना तातडीने जीएमसीमध्ये दाखल करण्यात येत आहे. या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी बुधवारी १५० जणांची टेस्ट करण्यात आली असून, त्यामध्ये काही जणांना जीएमसीमध्ये दाखल करण्यात आले आहे.
शहरात अत्यावश्यक सेवेची दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा आहे. या बाबीचा गैरफायदा घेऊन काहीजण दिवसभर विनाकारण फिरत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्गही झपाट्याने वाढत असून, शहरातील परिस्थिती आता गंभीर झाली आहे. तरुण तसेच युवती व महिलांचा मृत्यू झाल्याचे खळबळजनक वास्तव शहरात समोर आले आहे. मात्र, त्यानंतरही विनाकारण फिरणाऱ्यांना काहीही सोयरसुतक नसल्याने पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या निर्देशावरून अशा विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना टेस्ट करण्यात येत आहे. शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनात शहरात गस्त घालण्यात येत असून, दिवसभर एक वाहन त्यांच्यासोबत राहत आहे. या वाहनात कोविड टेस्टची सुविधा करण्यात आली आहे. विनाकारण फिरणाऱ्यांना पकडल्यानंतर त्याची जागेवरच कोविड टेस्ट करण्यात येत आहे. या टेस्टमध्ये ज्याचा अहवाल पॉझिटिव्ह येत आहे, अशा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना तातडीने जीएमसीमध्ये दाखल करण्यात येत आहे. बुधवारी या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला असून, सिटी कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत तब्बल १५० जणांना ताब्यात घेऊन त्यांची टेस्ट करण्यात आली. शहरवासीयांनी कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेता विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांनी केले आहे. या कारवाईसाठी सिटी कोतवालीचे ठाणेदार उत्तमराव जाधव व वाहतूक शाखेचे प्रमुख गजानन शेळके यांनी सहकार्य केले.