‘विकेल ते पिकेल’च्या संकल्पनेतून केली झीरो बजेट शेती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:14 AM2021-01-10T04:14:28+5:302021-01-10T04:14:28+5:30
बबन इंगळे सायखेड : पारंपरिक शेती करत असताना ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेतून आधुनिक पद्धतीने शेती करण्यावर भर देण्याची ...
बबन इंगळे
सायखेड : पारंपरिक शेती करत असताना ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेतून आधुनिक पद्धतीने शेती करण्यावर भर देण्याची किमया एका युवा शेतकऱ्याने करून दाखवली आहे. सोयाबीनसारख्या पिकांना फाटा देत ऊस पिकवून त्यापासून घरीच सेंद्रिय गूळनिर्मितीचे काम सुरू केले. बार्शिटाकळी तालुक्यातील खांबोरा या गावातील युवा शेतकरी विनय गावंडे यांनी वडिलोपार्जित शेतीमध्ये उसाची लागवड करून सेंद्रिय गूळनिर्मितीचे काम सुरू केले. त्यांचे दिवंगत वडील उद्धवराव गावंडे यांच्या कार्याचा वारसा ४० वर्षांपासून सुरूच आहे.
बळीराजाने आयुष्यभर शेतात राबून हरित क्रांती घडविण्याचे स्वप्न पहावे. परंतु, निसर्गाच्या प्रकोपाने वेळोवेळी शेतातील पिकांचे होणारे नुकसान, उत्पादनात घट, शेतमालाला योग्य भाव न मिळणे आदी कारणांनी शेतकऱ्यांचे स्वप्न धुळीस मिळते. हे वास्तव अनेकदा दुष्काळी स्थितीत पाहावयास मिळते. अशा परिस्थितीतही युवकाने प्रेरणावाट निर्माण केली आहे.
सेंद्रिय गूळनिर्मिती ही ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेतून होत असल्याने याला कृषी विभागाच्या ‘आत्मा’ची जोड आहे. आत्मांतर्गत गावंडे यांनी कै. उद्धवराव गावंडे शेतकरी उत्पादक गटाची नोंदणी करून शेतीला जोडधंदा मिळाला आहे. परिसरातील इतर शेतकरीसुद्धा गावंडे यांच्या शेतातून उसाचे बेणे विकत घेऊन लागवड करतात आणि सेंद्रिय गूळनिर्मितीसाठी तयार ऊस त्यांना देतात. तालुक्यात त्यांचा आदर्श घेऊन अनेक शेतकरी ऊस लागवडीकडे वळले असून, यंदा उसाचा बहुतांश पेरा आहे.
................
आरोग्यदायी गुळाची मुंबई, पुणे बाजारपेठ
दैनंदिन वापरात असलेल्या गुळाच्या तुलनेत सेंद्रिय गूळ हा आरोग्यासाठी पोषक व लाभदायी असल्याने आयुर्वेदातसुद्धा त्याला महत्त्व आहे. गावंडे हे दैनंदिन २५० ते ३०० किलो गूळ तयार करीत असून, १० व १५ किलो वजनाच्या भेलीमध्ये तो असतो. प्रतिकिलो ८० रुपयांप्रमाणे तो विकला जात बसून, याची बाजारपेठ मुंबई व पुणे येथे आहे. अकाेला जिल्ह्यातही गुळाची विक्री हाेत आहे.