जीवन विद्येतून जीवन जगण्याचा मूलमंत्र
By admin | Published: September 24, 2015 01:09 AM2015-09-24T01:09:15+5:302015-09-24T01:09:15+5:30
जीवन विद्येचे प्रणोते ए.नागराज यांची लोकमतशी बातचित.
बुलडाणा : प्रत्येक मनुष्याची इच्छा ही फक्त आणि फक्त सुखी समाधानी होणे हीच असते. दु:ख, आर्थिक विषमता, सामाजिक उच्च-निच भेद हे सूजान नागरिकांना नको असते. त्यामुळे रचनात्मक, वंचितांना न्याय मिळवून देणारी विश्वबंधुत्वाची संकल्पना मांडून, तिची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी काही मानवीय सुत्र आवश्यक असतात. मानवी आवश्यकतांना पूर्ण करण्याचे, किंबहुना जगण्याचे एक सर्वसामान्य स्वरूप जीवन विद्येतून हाती येते. जीवन जगण्याचा मूलमंत्र देण्याचे काम जीवन विद्या करत आहे, असे प्रतिपादन जीवन विद्येचे प्रणेते ए.नागराज यांनी केले. मोताळा येथे आयोजित संमेलनासाठी ते बुधवारी जिल्ह्यात दाखल झाले. यावेळी त्यांनी लोकमतशी संवाद साधला
प्रश्न : जीवनविद्या काय आहे ?
मानवी गरजांना पूर्ण करणारे, जगण्याचे एक सर्वमान्य स्वरूप म्हणजे जीवनविद्या. सर्वसमावेशक विचारांचे अस्तित्व स्वीकारत असताना समजावून घेण्याची प्रक्रिया सर्वांनाच करता आली तर सार्थक समाजकार्याची जाणीव निर्माण करणारी एक परंपरा तयार होईल. व्यक्तीवाद, संप्रदायवाद, रहस्यवाद यापासून मुक्त होत सर्व मानवांसाठी जगण्याचा प्रस्ताव म्हणजे जीवनविद्या.
प्रश्न : या विचारधारेचा मूळ गाभा काय आहे?
ही विचारधारा व्यक्तीवाद, संप्रदायवाद, रहस्यवादापासून मुक्त आहे. हा सर्व मानवांसाठी जगण्याचा प्रस्ताव आहे. व्यक्ती-व्यक्तीमधील परस्पर संबंध समजून घेतल्याने आणि त्या संबंधाचा निर्वाह केल्याने एका अखंड समाजाची व्देष, मत्सरविरहीत समाज रचना होवू शकेल, हा आशावाद ही विचारधारा सांगते.
प्रश्न : कोणत्या मुद्यांवर आपण भर देता?
समाज व्यवस्था हे उद्दीष्ट आहे. यासाठी शिक्षण व परिवार या माध्यमातून जीवन विद्येचा प्रसार, प्रचार करताना शिक्षणाला मानवीय चेहरा देण्याचे काम केले जात आहे. समाज व्यवस्था सदृढ होण्यासाठी प्रत्येकाला वैचारिक समाधान हवे असते व हे समाधान आपले प्रश्न सुटले तर नक्कीच मिळते. त्यामुळे मानवाचे प्रश्न सुटतील, असा विश्वास प्रत्येकामध्ये यायला हवा. त्यासाठी परिवार हाच समाज व्यवस्थेचा मूळ घटक समजून आम्ही कार्य करत आहोत.
प्रश्न : आपल्या कार्याला कसा प्रतिसाद आहे ?
मुल्य, चरित्र आणि नैतिकता यांच्या स्पष्टतेने समाजातील प्रत्येक घटकामधील संबंध गाव, देश व विश्व पातळीवर प्रमाणित झाले तर विश्व हेच एक निकोप कुटुंब होईल. त्या दृष्टीने प्रयत्न करत असताना छत्तीसगढसारख्या राज्याने प्राथमिक स्तरावरील शिक्षणात या विचारांचा अंगीकार केला. उत्तरप्रदेश, पंजाब, हरियाना आदी राज्यांमध्ये उच्च व तंत्रशिक्षणात याचा समावेश करण्यात आला.
प्रश्न : राज्याच्या बाहेरही कार्य चालते का ?
ही एक विचार व्यवस्था आहे. यामध्ये कुठलेही अवडंबर नाही, गंडेदोरे नाहीत, गुरूशिष्य नाही, प्रत्येक जण हा स्वतंत्र अस्तीत्व असणारी व्यवस्था आहे. त्यामुळे येथे सहभागी होणारा प्रत्येक जण हा परिवाराचा सदस्य असतो. असा हा परिवार महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, गुजरात, आंधप्रदेश यासोबतच भूतान आणि कॅनडा अशा देशांपर्यंत पोहोचला आहे. ज्यांना विचार भावतात ते त्याचा अंगीकार करतात. येथे विचारांच्या प्रतिवादालाही तेवढेच महत्व आहे.
प्रश्न : या संमेलनातून काय संदेश देणार आहात ?
हे विसावे आंतरराष्ट्रीय जीवनविद्या संमेलन आहे. कोणताही विचार हा समाजमान्य होण्यासाठी वेळ लागतो, त्यामुळे या व्यवस्थेत समजून घेणे याला महत्व आहे. या संमेलनातून अनेक प्रश्न समजून घेताना, मानवीय जीवन जगण्याचे मूलमंत्र देण्याचा प्रयत्न केला जाईल.