अधिकारी जुमानत नसल्याच्या मुद्द्यावरून आयुक्त, नगरसेवकांमध्ये खडाजंगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:44 AM2020-12-17T04:44:12+5:302020-12-17T04:44:12+5:30
मनपात बुधवारी आयाेजित सर्वसाधारण सभेत मंजूर विकास याेजनेत जुने आरटीओ कार्यालयाच्या जागेतील खेळाच्या मैदानाचे आरक्षण हटविण्याच्या प्रस्तावावरून काॅंग्रेस, शिवसेना ...
मनपात बुधवारी आयाेजित सर्वसाधारण सभेत मंजूर विकास याेजनेत जुने आरटीओ कार्यालयाच्या जागेतील खेळाच्या मैदानाचे आरक्षण हटविण्याच्या प्रस्तावावरून काॅंग्रेस, शिवसेना व भाजपमध्ये चांगलेच घमासान रंगल्याचे पहावयास मिळाले. याप्रस्तावाला स्पष्ट विराेध असल्याची भूमिका सत्तापक्षाच्या वतीने स्थायी समिती सभापती सतीश ढगे यांनी मांडली. त्यावर प्रस्ताव सादर करणाऱ्या नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावर खुलासा करण्याची मागणी शिवसेनेचे नगरसेवक मंगेश काळे यांनी लावून धरली. काळे यांनी वारंवार मागणी करूनही प्रभारी नगररचनाकार संजय नाकाेड उत्तर देत नसल्याचे पाहून काळे यांनी नाकाेड यांच्या कार्यप्रणालीवर तीव्र आक्षेप नाेंदवत सभागृह डाेक्यावर घेतले. आयुक्तांनी निर्देश दिल्यानंतर संजय नाकाेड यांनी माइकसमाेर विलंबाने येऊन बाेलण्याचा प्रयत्न केला. ताेपर्यंत प्रभारी नगररचनाकार नाकाेड यांच्यासह इतर अधिकारी जुमानत नसल्याचा आराेप करीत काॅंग्रेस, शिवसेना व एमआयएमच्या नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले.
संजय नाकाेड यांनी साेडले सभागृह
सर्वसामान्य नागरिकांच्या घराचे नकाशे मंजूर न करता जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवले जात असल्याचे नमूद करीत शिवसेनेचे नगरसेवक मंगेश काळे यांनी मनपाचे प्रभारी नगररचनाकार संजय नाकाेड यांना धारेवर धरले. काही मर्जीतील बड्या बिल्डरांच्या फायली ताबडताेब मंजूर हाेत असल्याचे मंगेश काळे यांनी सांगत सभागृहात चांगलाच गाेंधळ घातला. या मुद्द्यावरून सर्वपक्षीय नगरसेवकांचा राेष पाहता प्रभारी नगररचनाकार संजय नाकाेड अचानक सभागृहातून निघून गेले.
अधिकाऱ्यांच्या मुद्द्यावरून बिनसले
समस्या निराकरणासाठी संपर्क साधल्यावरही अधिकारी भ्रमणध्वनी स्वीकारत नसल्याचा मुद्दा एमआयएमचे नगरसेवक माेहम्मद मुस्तफा यांनी मांडला. त्यावर तुम्ही तक्रार द्या, अशा अधिकाऱ्यांविराेधात चार दिवसांत कारवाई करताे, असे आयुक्तांनी सांगितले. त्यावर तुम्हीही काॅल स्वीकारत नसल्याने तुमच्यावर काेण कारवाई करणार,असे माे.मुस्तफा यांनी म्हणताच आयुक्तांनी सभागृहातून जाण्याचा प्रयत्न केला.