खैरखेडच्या शेतकऱ्याने पानकोबीच्या शेतीतून शोधला विकासाचा मार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:18 AM2021-05-09T04:18:58+5:302021-05-09T04:18:58+5:30
विजय शिंदे अकोट: कोरोनाच्या संकट काळात रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याच्या दृष्टीने भाजीपाल्याची मागणी वाढली आहे. ही बाब लक्षात घेता खैरखेड येथील ...
विजय शिंदे
अकोट: कोरोनाच्या संकट काळात रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याच्या दृष्टीने भाजीपाल्याची मागणी वाढली आहे. ही बाब लक्षात घेता खैरखेड येथील एका शेतकऱ्याने परंपरागत पिकाला फाटा देत पानकोबीची लागवड केली. केवळ तीन महिन्यात भरघोस उत्पादन घेऊन विकासाचा मार्ग शोधला. तसेच लाॅकडाऊन काळात संकटात सापडलेल्या मजुरांना रोजगार उपलब्ध करून दिला.
सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या खैरखेड येथील धनंजय जगन्नाथ मेतकर यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर भाजीपाल्याला वाढलेली मागणी लक्षात घेत शेतात पानकोबीची लागवड केली. रासायनिक खत व औषध फवारणीचा वापर न करता शेणखताचा आधार घेत पानकोबीचे पीक फुलवले. सुरुवातीला पानकोबीची रोपे तयार केली, त्यानंतर दोन एकरात लागवड केली. अवघ्या अडीच महिन्यात दोन एकरातील पानकोबी चांगलीच बहरली. एक किलोपासून तर दीड किलोची फळ धारणा झाली. या लागवडीकरिता शेतकऱ्याने जवळपास ७४ हजार ७५० रुपये खर्च केला. भरघोस उत्पादन मिळवून त्याने पानकोबीची विक्री करीत जवळपास १ लाखाचा नफा मिळविल्याचे शेतकऱ्याने सांगितले. (फोटो)
मजुरांना मिळाला रोजगार!
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार हिरावल्या गेला. काही मजूर महानगरातून ग्रामीण भागात परतले. त्यांच्या हाताला काम नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. ही बाब लक्षात घेत धनंजय जगन्नाथ मेतकर यांनी यांत्रिक शेतीवर भर न देता पारंपरिक पद्धतीने शेती करून गावातीन अनेक मजुरांना रोजगार दिला.