खामगाव: मजबूतीकरण न करता रस्ता निर्मितीचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 03:01 PM2019-09-16T15:01:30+5:302019-09-16T15:01:37+5:30
डांबरचा थर मशिनरीच्या सहाय्याने काढून त्याचे मजबूतीकरण न करता त्यावरच सिमेंट रस्ता तयार केला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: शहरातून नांदुराकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्याचे चौपदरीकरण व काँक्रिटीकरणाचे काम निकृष्टदर्जाचे होत आहे. अस्तित्वात असलेल्या रस्त्यावरील डांबरचा थर मशिनरीच्या सहाय्याने काढून त्याचे मजबूतीकरण न करता त्यावरच सिमेंट रस्ता तयार केला जात असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. या प्रकाराकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नियंत्रण अधिकाऱ्यांप्रमाणेच लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष होत आहे.
खामगाव शहरातील हा मुख्य रस्ता आहे. सुमारे ६० कोटी रुपये खर्चुन चौपदरीकरण व काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. गेल्या दीड वर्षापासून हे काम अत्यंत धिम्यागतीने सुरु आहे. सुरवातीला हे काम सुरु करण्यापूर्वी दोन्ही बाजुने नाली बांधकाम करण्यात आले. पाच ते सहा महिन्याचा कालावधी उलटला नाही तोच नाली बांधकामही अनेक ठिकाणी उखडल्याचे दिसून येते. बहुतांश भागात तुकड्या तुकड्याने हे काम केले असून एकसंघपणे नाली बांधकाम करण्यात आले नाही. त्यावर टाकण्यात आलेल्या स्लॅबलाही तडे गेले आहेत. काँक्रीट रस्त्याचे काम करतांना रस्त्याच्या दोन्ही बाजुने कमीजास्त प्रमाणात खोदकाम करून त्याचे गिट्टी व मुरुमाच्या सहाय्याने मजबूतीकरण होणे गरजेचे होते. मात्र तसे झाले नाही. प्रत्यक्षात फक्त मुरुम टाकून दबाई करून काँक्रीटीकरण करण्यात आले. मध्यभागातील पुर्वीचा डांबररस्ता पुर्ण खोदून नव्याने त्याचे मजबूतीकरण करणे आवश्यक होते. मात्र संबधित कंत्राटदार कंपनीने वरील डांबरचा थर काढून त्यावरच सरळ काँक्रीटीकरण केल्या जात असल्याचे रविवारी दिसून आले. मजबूतीकरण न करता थातूरमातूर होत असलेल्या या रस्त्याच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
‘न्हाई’च्या अधिकाºयांसह लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष
दिवसभर रस्ता वाहतूक सुरु असल्याने सदर कंत्राटदार कंपनी रत्रीच्या अंधारात काँक्रिटीकरणाचे काम करीत आहे. त्यामुळे हा प्रकार लक्षात येत नाही.
४सकाळी शहरातील नागरिकांना थेट काँक्रिटचा रस्ता तयार झालेला दिसतो. मात्र त्याच्या मजबूतीकरणामध्ये सदर कंत्राटदार कंपनीने नेमके कोणते गौडबंगाल केले याची मागमूसही राहत नाही. या सर्व प्रकाराकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकाºयांचेही दुर्लक्ष झाले आहे. याशिवाय स्थानिक लोकप्रतिनिधींनीही याकडे कानाडोळा केला आहे.
नियंत्रणाविना सुरु आहे काम
या रस्ता कामावर कुणाचेही नियंत्रण नाही. कंत्राटदार मनमानीपणे काम करीत आहे. शहरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी यापूर्वी सुद्धा निकृष्ट रस्ता कामाबाबत तक्रारी केल्या. मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही.
कंपनीकडून रस्त्याचे काम नियमानुसारच होत आहे. यावर प्राधिकरणाचे पुर्ण नियंत्रण आहे. सायंटिफकली तिच पद्धत योग्य आहे. डांबरीकरणाखाली खोदण्यात काही अर्थ नाही. तो रस्ता आधीच पक्का आहे. त्यावरील डांबराची लेअर काढून ‘डिएलसी’ केले जात आहे.त्यावर काँक्रिटीकरण केले जात आहे. जे आहे ते योग्य सुरु आहे.
- विलास ब्राम्हणकर,
प्रकल्प संचालक, महामार्ग प्राधिकरण