खामगाव येथील भाजीबाजारात शासनाच्या आदेशाला ‘खो’
By admin | Published: August 5, 2016 12:45 AM2016-08-05T00:45:35+5:302016-08-05T00:45:35+5:30
अडत्यांची मुजोरी शेतक-यांच्या मुळावर!
नाना हिवराळे
खामगाव (जि. बुलडाणा)- शेतमाल व भाजीपाला अडतमुक्त करण्यात आला असला, तरी खामगावच्या भाजीबाजारात मात्र अडत्यांची मुजोरी कायम आहे. येथील भाजी बाजारात शेतकर्यांकडूनच १0 टक्के अडत घेतली जात असल्याचे धक्कादायक वास्तव उजेडात आले आहे.
शेतकर्यांनी आणलेल्या शेतीमालावरील अडत ही शेतकर्यांकडून न घेता ती व्यापार्यांकडून घ्यावी, असा आदेश शासनानेच दिला आहे. तसेच भाजीपाला विक्रीवरील अडतही व्यापार्यांकडून घेण्याबाबत आदेश दिला आहे. शासनाच्या या आदेशाविरुद्ध व्यापार्यांकडून बाजार समितीचे व्यवहार तीन वेळा बंद ठेवण्यात आले. दरम्यानच्या काळात बाजार समित्या सुरू झाल्या आहेत. मात्र येथे शेकडा १0 टक्के दराने शेतकर्यांकडून अडत कपात करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे हमाली व इतर खर्चही शेतकर्यांकडूनच वसूल करण्यात येत आहे.
खामगाव ही बुलडाणा जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ आहे. येथे जिल्हाभरातून नव्हे, तर इतर जिल्ह्यातूनही भाजीपाला विक्रीस येतो. भाजीपाला हे नियमनमुक्त असतानाही खामगावात १0 टक्के दराची अडत शेतकर्यांकडून कपात करण्यात येत असल्याने शेतकर्यांमध्ये ताराजी व्यक्त केली जात आहे.
शेतकर्यांना दिली जाते कच्ची पावती
भाजीबाजारात सध्या शेतकर्याला अडत दुकानाच्या परवान्याची पावती न देता कोर्या पावतीवर हिशेब लिहून दिला जात आहे. या हिशेबामध्ये १0 टक्के अडत कपातीचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. सोबतच हमाली व इतर खर्चही कपात करण्यात आला आहे. याबाबत शेतकर्यांना विचारणा केली असता नेहमीच शेतमाल विकायला आणावा लागतो. त्यामुळे अडत्यांशी वैर नको, अशी प्रतिक्रिया शेतकर्यांकडून येत आहे.
-"शासनाच्या अध्यादेशानुसार भाजीपाला विक्री करताना अडत घेता येत नाही. अडत घेणार्या व्यापार्यांविरुद्ध तक्रार करण्यासाठी शेतकर्यांनी पुढे येण्याची गरज आहे. अशा व्यापार्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे शेतकर्याचे नावही गोपनीय ठेवण्यात येईल."
- एम.ए. कृपलानी
सहायक निबंधक, खामगाव.