खानापूर सरपंच, उपसरपंचासह एक सदस्य अपात्र घोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 01:40 AM2017-09-09T01:40:13+5:302017-09-09T01:40:18+5:30
पातूर : पातूरनजीकच्या खानापूर ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंचांसह एका सदस्याकडे शौचालय नसल्याच्या कारणावरून जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी त्यांना ६ सप्टेंबरच्या आदेशान्वये अपात्र घोषित केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पातूर : पातूरनजीकच्या खानापूर ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंचांसह एका सदस्याकडे शौचालय नसल्याच्या कारणावरून जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी त्यांना ६ सप्टेंबरच्या आदेशान्वये अपात्र घोषित केले आहे.
खानापूर ग्रामपंचायतमध्ये एकूण नऊ सदस्य आहेत. त्यात पाच महिला, तर चार पुरुष सदस्यांचा समावेश आहे. खानापूर ग्रा.पं.चे माजी सदस्य सुरेश आत्माराम शिरसाट यांनी ग्रा.पं.च्या सर्व सदस्यांच्या घरी शौचालय आहे की नाही, याची चौकशी करून अहवाल देण्याची मागणी ग्रामपंचायतकडे रीतसर अर्ज दाखल करून केली होती. त्यानुसार तत्कालीन ग्रामसेवक बी.बी. आडे, तंटामुक्त ग्राम समितीचे अध्यक्ष, पोलीस पाटील, प्रभारी सरपंच, ग्रा.पं. कर्मचार्यांनी पाहणी करून पंचनामा केला होता.
त्यामध्ये सहा सदस्यांकडे शौचालय असल्याचे व तीन सदस्यांकडे शौचालय नसल्याचे सिद्ध झाले होते. त्यामुळे सुरेश शिरसाट यांनी २८ जुलै रोजी जिल्हाधिकार्यांच्या न्यायालयात प्रकरण दाखल केले होते. त्या अनुषंगाने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ च्या १४ (ज.५ ) अन्वये या प्रकरणातील अभिलेख व तत्कालीन सचिवांनी दाखल केलेल्या अहवालावरून सरपंच गजानन गोवर्धन धाडसे, उ पसरपंच सुरेश काशिराम कावळे व सदस्या अलका रामकृष्ण सदर यांच्याकडे शौचालय नसल्याचे सिद्ध झाल्याने त्यांना सदस्य पदासाठी अपात्र घोषित केले आहे.
संबंधित अहवालाच्या आदेशाची प्रत मला मिळाली नसून, प्रत मिळाल्यानंतर मी रिक्त पदांचा अहवाल वरिष्ठ अधिकार्यांना सादर करणार आहे.
- वैशाली खाकरे,
ग्रामसेविका, खानापूर.