कुंभमेळ्याला जाताना अकोल्यातील खंडेलवाल कुटुंबीयांना रेल्वेगाडीत लुटले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 01:45 PM2019-02-02T13:45:09+5:302019-02-02T13:45:43+5:30

अकोला: उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यात रेल्वेगाडीने जात असताना, अज्ञात दरोडेखोरांनी पिस्तूल व धारदार शस्त्रांचा धाक दाखवून अकोल्यातील खंडेलवाल कुटुंबीयांकडील सोन्याचे दागिने, मोबाइल व रोख असा ७ ते ८ लाख रुपयांचा ऐवज लुटून नेला.

Khandelwal family in Akola looted in railway train while going to Kumbh Mela | कुंभमेळ्याला जाताना अकोल्यातील खंडेलवाल कुटुंबीयांना रेल्वेगाडीत लुटले!

कुंभमेळ्याला जाताना अकोल्यातील खंडेलवाल कुटुंबीयांना रेल्वेगाडीत लुटले!

Next

अकोला: उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यात रेल्वेगाडीने जात असताना, अज्ञात दरोडेखोरांनी पिस्तूल व धारदार शस्त्रांचा धाक दाखवून अकोल्यातील खंडेलवाल कुटुंबीयांकडील सोन्याचे दागिने, मोबाइल व रोख असा ७ ते ८ लाख रुपयांचा ऐवज लुटून नेला. ही घटना गुरुवारी रात्री १.३0 वाजताच्या सुमारास इटारसीजवळ घडली. या प्रकरणात जीआरपी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
रा. स्व. संघाचे नगर संघचालक गोपाल खंडेलवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार ते प्रयागराज येथील कुंभमेळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी रेखा खंडेलवाल, दिनेश खंडेलवाल (५४), पुष्पा खंडेलवाल (५२), जुगलकिशोर खंडेलवाल (४२), शर्मिला खंडेलवाल (४0), रिंकू खंडेलवाल (३८) आदींसह १५ जण सिकंदराबाद-दानापूर रेल्वेगाडीने जात असताना, इटारसी ते पिपरिया रेल्वेस्थानकाच्या दरम्यान रेल्वेगाडीच्या जनरल डब्यातून साखळी ओढून दहा दरोडेखोरांनी रेल्वेगाडीच्या बी-४ डब्यात प्रवेश केला. या डब्यात बसलेले दिनेश खंडेलवाल, पुष्पा खंडेलवाल, जुगल खंडेलवाल, शर्मिला खंडेलवाल, रिंकू खंडेलवाल यांना धारदार चाकूचा आणि पिस्तूलचा धाक दाखवून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने, रोख आणि क्रेडिट व डेबिट कार्डसुद्धा हिसकावून घेतले. याच डब्यातील एका प्रवाशाने विरोध केला, तर त्याच्या हातावर चाकूने वार करून त्याला जखमी केले. गोपाल खंडेलवाल व रेखा खंडेलवाल हे ए-१ डब्यात होते. त्याच्या डब्यातील कर्मचाऱ्याला हा प्रकार लक्षात आल्यामुळे त्यांनी आतून दरवाजा बंद करून घेतला. त्यामुळे या डब्यात दरोडेखोर प्रवेश करू शकले नाहीत. या प्रकरणात जबलपूर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. पिपरिया जीआरपी पोलिसांनी अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. (प्रतिनिधी)

खासदार धोत्रे यांनी घेतली रेल्वे मंत्र्यांची भेट!
खासदार संजय धोत्रे यांना घटनेची माहिती मिळाल्यावर त्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांची भेट घेतली आणि त्यांना घटनाक्रम सांगितला. या प्रकरणाची चौकशी करून दरोडेखोरांना जेरबंद करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. खासदार धोत्रे यांच्या सांगण्यानुसार केंद्रीय रेल्वे मंत्री गोयल यांनी रेल्वे अधिकाºयांना तातडीने कारवाई करण्याचा आदेश दिला. आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर यांना घटनेची माहिती मिळताच, त्यांनी त्वरित भुसावळ व इटारसी रेल्वे अधिकाºयांशी संपर्क साधला आणि कारवाई करण्यास सांगितले. खासदार धोत्रे, आमदार शर्मा, आमदार सावरकर यांनी गोपाल खंडेलवाल यांच्याशी संपर्क साधून विचारपूस केली.

 

Web Title: Khandelwal family in Akola looted in railway train while going to Kumbh Mela

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.