खंडवा पोलिसांनी जप्त केलेले ७0 लाखांचे सोने अकोल्यातील सराफाचे!
By admin | Published: November 27, 2015 01:52 AM2015-11-27T01:52:14+5:302015-11-27T01:52:14+5:30
कारागिरासह दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी
अकोला: खंडवा पोलिसांनी इंदोर-अमरावती रोडवर कारमधून जप्त केलेले २ किलो ३00 ग्रॅम सोने आणि ३0 किलो चांदी अकोल्यातील सराफा व्यावसायिकांची असल्याची माहिती समोर आली आहे. खंडवा पोलिसांनी अटक केलेला अकोल्यातील सराफा कारागीर प्रशांत साहू याच्यासह त्याच्या दोन सहकार्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. खंडवा पोलिसांनी गस्तीदरम्यान २४ नोव्हेंबर रोजी रात्री इंदोर-अमरावती रोडने अकोल्याकडे जाणारी एमएच ३0 एएफ ३0१३ क्रमांकाची इंडिका कार थांबविली. कारची तपासणी केली असता, त्यामध्ये अडीच किलो सोने आणि ३0 किलो चांदी मिळून आली. पोलिसांनी अकोल्यातील टॉवर चौकात राहणारा सराफा कारागीर प्रशांत साहू आणि त्याचे दोन सहकारी रीतेश प्रेमसिंह ठाकूर, गोविंद सीताराम (दोघेही रा. अकोला) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील सोने, चांदी व कार जप्त केली. खंडवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत हा अकोल्यात सराफा कारागीर आणि व्यवसायी असल्याचे सांगत आहे. त्याचा दागिने घडविण्याचा व्यवसाय असल्याने, त्याने ७0 लाख रुपयांचे सोने इंदोर येथील एका व्यापार्याकडून खरेदी केले होते आणि ते घेऊन तो कारने अकोल्याकडे येत होता. सुरुवातीला पोलिसांच्या चौकशीमध्ये त्याने सोने खरेदीची पावती नसल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यासह त्याच्या दोन सहकार्यांना अटक केली. त्यांना एक दिवस पोलीस कोठडीत ठेवले. त्यानंतर प्रशांत साहू याने सोने खरेदी पावती खंडवा पोलिसांना दिली. पावतीवरून हे सोने त्याचेच असल्याचे समोर आले. तिघांनाही न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.