जिल्ह्यात खरीप हंगामाच्या शेतीकामांना आला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:15 AM2021-05-31T04:15:25+5:302021-05-31T04:15:25+5:30
रखरखत्या उन्हातही शेतकऱ्यांनी शेती मशागतीच्या कामांना सुरुवात केली आहे. खरीप हंगामासाठी कृषी कर्जाचे वितरण लवकर करण्यात यावे. बी-बियाणे व ...
रखरखत्या उन्हातही शेतकऱ्यांनी शेती मशागतीच्या कामांना सुरुवात केली आहे. खरीप हंगामासाठी कृषी कर्जाचे वितरण लवकर करण्यात यावे. बी-बियाणे व रासायनिक खते वाजवी दरात उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी शेतकरी रासायनिक खतांपेक्षा शेणखत शेतात टाकत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने बळीराजा कर्जाच्या खाईत लोटला गेला; मात्र तरी देखील यंदा नवीन जोमाने व आशेने शेतकरी कामाला लागला आहे. पैशांची जमवाजमव करून मशागतीच्या कामाला शेतकरी लागले आहे. पेरणीकरिता बियाणे खरेदीसाठी पैशांची जुळवाजुळव करताना शेतकऱ्यांची मोठी दमछाक होताना दिसत आहेत. बी-बियाणे, खते खरेदीसाठी कर्ज घेण्यासाठी बँकेत शेतकऱ्यांची गर्दी होत आहे.
ट्रॅक्टरद्वारे मशागतीकडे कल
बैलजोडीद्वारे अनेक शेतकरी आपल्या शेताची मशागत करतात; मात्र ज्यांच्याकडे बैल नाहीत त्यांना बैलजोडीचा शोध घ्यावा लागतो. शिवाय बैलजोडीने मशागत करताना अधिक वेळ लागत असल्याने ट्रॅक्टरने शेताची मशागत केली जात आहे व नागरणी खोलवर होते. यामुळे शेतकऱ्यांचा ट्रॅक्टरद्वारे मशागतीकडे कल वाढला आहे.