ग्राम कृषी विकास समित्यांच्या बैठकांमध्ये अंतिम होणार खरीप हंगामाचा आराखडा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:19 AM2021-05-26T04:19:16+5:302021-05-26T04:19:16+5:30
संतोष येलकर अकोला : ग्राम कृषी उत्पादन आराखडा लोकाभिमुख करण्यासाठी राज्यातील गाव पातळीवर गठित करण्यात आलेल्या ग्राम कृषी विकास ...
संतोष येलकर
अकोला : ग्राम कृषी उत्पादन आराखडा लोकाभिमुख करण्यासाठी राज्यातील गाव पातळीवर गठित करण्यात आलेल्या ग्राम कृषी विकास समित्यांच्या बैठकांमध्ये यावर्षीच्या खरीप हंगामाचा गावनिहाय विकास आराखडा अंतिम करण्यात येणार आहे. त्यासाठी कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत मे अखेरपर्यंत ग्राम कृषी विकास समित्यांच्या बैठका ऑनलाइन पध्दतीने घेण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे.
ग्राम कृषी उत्पादन आराखडा जास्तीत जास्त लोकाभिमुख होण्यासाठी राज्यात गाव पातळीवरील ग्राम कृषी विकास समित्यांमध्ये ग्राम कृषी उत्पादन आराखडा अंतिम करण्याच्या सूचना कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी कृषी विभागाला दिल्या आहेत. त्यानुसार ग्राम कृषी विकास समित्यांमध्ये शेतीविषयक सर्व बाबींसह गावातील जमीन, पर्जन्यमान, सिंचन सुविधा, उपलब्ध साधनसामग्री, दळणवळण इत्यादी बाबींचा विचार करून २०२१ या वर्षातील खरीप हंगामाचा ग्राम कृषी विकास आराखडा अंतिम करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यांत गठित करण्यात आलेल्या ग्राम कृषी विकास समित्यांच्या बैठकांमध्ये गाव पातळीवरील खरीप हंगामाचा ग्राम कृषी विकास आराखडा अंतिम करण्यात येणार आहे. त्यामध्ये कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मे अखेरपर्यंत ग्राम कृषी विकास समित्यांच्या बैठका ऑनलाइन पध्दतीने घेऊन गाव पातळीवर खरीप हंगामाचा कृषी विकास आराखडा अंतिम करण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे.
अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत स्थापन करण्यात आलेल्या ग्राम कृषी विकास समित्यांच्या बैठकांमध्ये ३१ मेपर्यंत खरीप हंगामाचा गावनिहाय कृषी विकास आराखडा अंतिम करण्यात येणार आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ग्राम कृषी विकास समित्यांच्या बैठका ऑनलाइन पध्दतीने घेण्यात येणार असून, त्यामध्ये गाव पातळीवरील खरीप हंगामाचा कृषी विकास आराखडा अंतिम करण्यात येणार आहे.
- शंकर तोटावार
विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती विभाग